उस्मानाबाद : "आमच्या विरोधात बातमी का छापली" असे म्हणून एका साप्ताहिकाच्या संपादकास काठीने बेदम मारहाण करणा-या वकिलास उस्मानाबाद येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी के.बी. चौगुले यांनी तीन वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा व २५ हजार रुपयाचा दंड ठोठावला. तसेच दंड न भरल्यास सहा महिन्यांची शिक्षाही सुनावली.
    अभिजीत मोरे (रा. परंडा, जि. उस्मानाबाद) असे सश्रम कारावास झालेल्याचे नाव आहे. तर कार्यकारी संपादक एस.आर. भोसले (रा. देवगाव) असे पत्रकाराचे नाव आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, एका साप्ताहिकाचे कार्यकारी संपादक एस. आर. भोसले यांनी दि. १४ ऑक्टोबर २00३ रोजी परंडा येथील वकील अँड. सुभाष मोरे यांच्या विरोधात बातमी प्रसिद्ध केली होती. यानंतर काही दिवसांनी भोसले परंड्यात आले असता, पोलिस ठाण्याजवळ अँड. मोरे यांचे पुत्र अभिजीत सुभाष मोरे यांनी विरोधात बातमी छापल्याच्या कारणावरुन भोसले यांच्या दुचाकीला धडक देवून त्यांना खाली पाडले. तसेच 'तू आमच्या विरोधात बातमी का छापली' असे म्हणून भोसले यांना काठीने जबर मारहाण केली. यात भोसले यांच्या हात, पाय, छाती तसेच कमरेला गंभीर दुखापत झाली. त्यांच्यावर प्रारंभी परंडा येथे उपचार करण्यात आले. यानंतर त्यांना पुढील उपचारासाठी बा'र्शी येथे खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आल होते. या कालावधीत अभिजीत मोरे हे शिक्षण घेत होते. यानंतर त्यांनी औरंगाबाद येथे वकिली सुरु केली.
       दरम्यान, याप्रकरणी परंडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होवून पोलिसांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. या प्रकरणाची सुनावणी येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी के.बी. चौगुले यांच्या न्यायालयात झाली. सरकारी पक्षातर्फे सादर करण्यात आलेले पुरावे, साक्षी आदींवरुन न्यायालयाने अभिजीत मोरे यांना तीन वर्षे सश्रम कारावास व २५ हजार रुपयाचा दंड ठोठावला. तसेच दंड न भरल्यास सहा महिन्यांची शिक्षाही न्यायालयाने सुनावली. या प्रकरणात सरकार पक्षाच्या वतीने अँड. एस.पी. गुंजाळ यांनी काम पाहिले.
 
Top