कोल्हापूर - हिंदू-मुस्लिम मतभेदांचे राजकारण केले जात असताना कोल्हापूर जिल्हय़ातील नृसिंहवाडीच्या जवळच असलेल्या कुरुंदवाडमध्ये मात्र गेल्या 60 वर्षांपासून पाचही मशिदींमध्ये गणेशाची प्रतिष्ठापना करण्यात येते. हिंदू-मुस्लिम ऐक्याची ही संकल्पना कुरुंदवाडच्या नागरिकांनी प्रत्यक्षात आणली असून याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
    पटवर्धन यांचे संस्थान कुरुंदवाड. या ठिकाणी सर्वधर्मीयांमध्ये बंधुभाव जोपासण्याची परंपरा आहे. येथील सन्मित्र चौकात मोहरमचा उत्सव हिंदू-मुस्लिम मिळूनच साजरा करतात. यावरूनच जर मोहरम एकत्र साजरा होतो तर गणेशोत्सव का नाही, असा विचार करत काही युवकांनी 1953 मध्ये यासाठी पुढाकार घेतला. मुस्लिम बांधवांसमोर ही संकल्पना मांडण्यात आली. मुस्लिम बांधवांनी ही कल्पना मान्य केली आणि शहरातील बैरागदार मशिदीमध्ये 60 वर्षांपूर्वी पहिल्यांदा श्रींची प्रतिष्ठापना करण्यात आली. यानंतर टप्प्याटप्प्याने शेळके मशीद, कुडेखान मशीद, ढेपणपूर मशीद आणि कारखाना मशीद या उर्वरित चारही मशिदींमध्ये गणेशाची प्रतिष्ठापना करण्यास सुरुवात झाली.
    1953 मध्ये सुरू झालेल्या या परंपरेने आता मूळ धरले आहे. एकीकडे मशिदीसमोरून गणपती नेताना वाद होऊन न्यायालयीन लढाया, हाणामार्‍या सुरू असताना दुसरीकडे कुरुंदवाडसारखी ही शहरे म्हणजे विधायकतेची बेटेच असून त्यांचे अनुकरण अन्य शहरांनी, गावांनी करण्यास काहीच हरकत नाही, अशी अपेक्षा गावकरी व्यक्त करतात.

साभार - दिव्‍यमराठी

 
Top