नवी दिल्ली :- संपूर्ण देशाला हादरवून टाकणार्‍या दिल्लीतील सामुहिक अत्याचार प्रकरणातील चौघा आरोपींना जलदगती कोर्टाने आज शुक्रवार दि. 13 सप्‍टेंबर रोजी फाशीची शिक्षा सुनावली. अखेर सत्याचा विजय झाला आणि असत्याचा विनाश.  बुधवारी झालेल्या सुनावणीत दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर आज दुपारी अडीच वाजता कोर्टाने दोषींना फाशीची शिक्षा जाहीर केली.
मुकेश सिंग, विनय शर्मा, अक्षय ठाकूर आणि पवन गुप्ता अशी फाशीची शिक्षा सुनावलेल्या आरोपींची नावे आहेत.  राजधानी नवी दिल्लीत दि. 16 डिसेंबर रोजी एका चालत्या बसमध्ये वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या एका मुलीवर बसमध्ये असलेल्या पाच आरोपींनी अमानुषपणे सामूहिक बलात्कार करत तिच्यावर अन्वनित अत्याचार केले होते. या अमानुष अत्याचारानंतर सिंगापूर येथील हॉस्पिटलमध्ये त्या दुर्दैवी मुलीचा मृत्यू झाला होता.  
या खटल्यातील प्रमुख आरोपी राम सिंगने तिहार तुरूंगातच आत्महत्या केली होती तर या खटल्यातील एका अल्पवयीन आरोपीस बाल न्यायालयाने तीन वर्षे सुधारगृहात पाठवलं आहे.
आज या फाशीची शिक्षा सुनावलेल्या सर्व चारही आरोपींवर बलात्कार आणि हत्येचा गुन्हा सिद्ध झाला होता. त्यानंतर बुधवारी शिक्षेवर सुनावणी झाली होती. आज शिक्षेचा निर्णय आला. 
दिल्लीतील साकेत फास्ट ट्रॅक कोर्टाच्या या निकालावर आरोपींच्या वकिलांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. निकाल जाहीर झाल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी आरोप केला की न्यायालयाने सरकारच्या दबाबापुढे झुकून हा निर्णय दिला आहे. बलात्कारासाठी फाशीची शिक्षा देण्याने बलात्कार थांबणार नाहीत. असा युक्तीवादही या वकिलांनी केला.  
 
Top