मुंबई :- दिल्लीत झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणातील आरोपींच्या गुन्ह्याचे स्वरुप पाहता त्यांना न्यायालयाने दिलेली  फाशीची शिक्षा योग्यच असून या शिक्षेमुळे समाजात योग्य तो संदेश जाईल, अशी  प्रतिक्रिया गृहमंत्री आर.आर.पाटील यांनी दिली.
       दिल्ली सामूहिक बलात्कार प्रकरणातील आरोपींना न्यायालयाने आज फाशीची शिक्षा सुनावल्यानंतर गृहमंत्री श्री.पाटील यांनी या शिक्षेचे स्वागत करुन वरच्या न्यायालयातही  हीच शिक्षा कायम राहिल, असा विश्वास व्यक्त केला आहे. महिला अत्याचाराच्या गुन्ह्यांतील आरोपींना जास्तीत-जास्त शिक्षा व्हावी याकरीता केंद्र सरकारने कायद्यात सुधारणा करुन कठोर कायदे केले आहे. त्या कायद्याच्या अनुषंगानेच आज न्यायालयाने ही शिक्षा ठोठावल्याने जनमानसांत महिला अत्याचाराच्या घटनांप्रती  शासन,  पोलीस आणि न्यायालय संवेदनशील आहे, हा संदेश गेला आहे. खटल्याचा जसा  लवकर  निकाल लागला तशी पुढची प्रक्रियादेखील लवकर पूर्ण करुन आरोपींना फाशी दिली गेली पाहिजे, असेही गृहमंत्री श्री. पाटील यांनी  म्हटले आहे. 
     दरम्यान, मुंबईत शक्ती मिलच्या परिसरात तरुणीवर झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणाचे दोषारोपपत्र लवकरात-लवकर दाखल करण्याच्या सूचना पोलीस अधिका-यांना देण्यात आल्या असून हा खटला जलदगती न्यायालयात चालविण्यात येणार असल्याचे गृहमंत्री आर.आर.पाटील यांनी स्पष्ट केले आहे.
 
Top