मुंबई : दिल्ली सामुहिक बलात्कार प्रकरणातील चार आरोपींना सुनावण्यात आलेल्या फाशीच्या शिक्षेमुळे यापुढे असे घृणास्पद आणि माणुसकीला काळीमा फासणारे कृत्य करण्यास कुणीही धजावणार नाही अशा शब्दात मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. मुंबई येथे शक्ती मिल बलात्कार प्रकरणातही आम्ही लवकरात लवकर चार्जशीट दाखल करीत असून लवकरच निकाल लागेल अशी आशा असल्याचे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे. 
दिल्ली येथील 'फास्ट ट्रॅक' कोर्टाने आज दुपारी या खटल्यावर निकाल दिल्‍यावर मुख्यमंत्री बोलत होते. या निर्णयामुळे ‘त्या’  पीडित तरुणीच्या परिवारास काही प्रमाणात का होईना दिलासा मिळेल, असेही ते आपल्या प्रतिक्रियेत म्‍हणाले.
    राजधानीत बलात्काराच्या झालेल्या या घटनेमुळे देशभर जनप्रक्षोभ उसळला होता. त्याचप्रमाणे केंद्र सरकारने देखील बलात्कार विरोधी कायद्यात महत्वाचे बदल केले होते. या अनुषंगाने आज दिलेल्या या निर्णयाने या कायद्यातील कठोर तरतुदींच्या धाकाने भविष्यात असे गुन्हे करण्यास कुणीही धजावणार नाही, असे मुख्यमंत्री म्हणतात. केवळ आठ-नऊ महिन्यात या खटल्याचा निकाल लावल्या नेत्यांनी समाधान व्यक्त केले. महाराष्ट्रातही महिलांवरील अत्याचारांची प्रकरणे तातडीने निकाली निघावीत म्हणून जलदगती न्यायालये स्थापन करण्यात आली आहेत, असेही ना. चव्‍हाण यांनी सांगितले.
 
Top