नवी दिल्‍ली : गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार आहेत, असे भाजपचे अध्यक्ष राजनाथसिंह यांनी आज (शुक्रवार) शिवसेनेचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांना दूरध्वनीवरून सांगितले. दरम्यान, मोदींच्या उमेदवारीला शिवसेनेने पाठिंबा द्यावा अशी मागणी यावेळी राजनाथसिंह यांनी केल्याचे समजते.
      सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, नरेंद्र मोदी यांच्या नावाची आज घोषणा होण्याची शक्यता आहे. भाजपने आज संसदीय समितीची बैठक बोलविली आहे. त्यात यासंदर्भात निर्णय होण्याची शक्यता आहे. परंतु, भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांचा विरोध आणि दिल्ली सामूहिक बलात्कार प्रकरणाचा आज निकाल असल्याने मोदींच्या नावाची आज घोषणा होण्याची शक्यता जरा कमीच आहे.
       दरम्यान, मोदींच्या उमेदवारीला शिवसेनेने पाठिंबा दिल्याचे वृत्त आहे. पंजाबमधील अकाली दलानेही मोदींच्या नावावर सहमती दर्शविल्याचे समजते.

नरेंद्र मोदींच्या नावाला अडवाणींचा विरोध का?

नरेंद्र मोदींच्‍या पंतप्रधान पदाच्‍या उमेदवारीस लालकृष्‍ण अडवाणी का विरोध करीत आहेत ? सुषमा स्‍वराज आणि मुरली मनोहर जोशींना मोदींबाबत काय अडचण आहे ? ज्‍या मोदींनी गुजरातमध्‍ये आरएसएसला रोखण्‍याचा प्रयत्‍न केला त्‍याच संघाला मोदींबाबत एवढे प्रेम का उफाळून आले आहे ? या सर्व प्रश्‍नांचे उत्तर देशाला जाणून घ्‍यायचे आहे. मोदींच्‍या पंतप्रधानपदाच्‍या दावेदारीला भाजपच्‍या पार्लमेंटरी बोर्डाच्‍या निर्णयाची फक्‍त औपचारिकता बाकी आहे.  12 सदस्‍यांच्‍या या बोर्डात मोदींच्‍या बाजूने आठ सदस्‍य आहेत. मात्र, मोठया निर्णयासाठी पक्षात मत विभाजनाची परंपरा नाही. त्‍यासाठी नेतृत्‍व सर्वसहमतीसाठी प्रयत्‍न करीत आहेत. याचे कारण म्‍हणजे अडवाणी आणि जोशींसारख्‍या ज्‍येष्‍ठ नेत्‍यांनी भूतकाळात केलेल्‍या काही गोष्‍टींचा हा परिणाम आहे.

* साभार - दिव्‍यमराठी
 
Top