कळंब :- आईसोबत कपडे धुण्‍यासाठी गेलेल्‍या एका 11 वर्षीय मुलाचा तलावात बुडुन मृत्‍यू झाल्‍याची घटना देवधानोरा (ता. कळंब) येथे घडले. त्‍याचे प्रेत तब्बल २३ तासाने सापडले.
    अभिजीत उन्‍नेश्‍वर बुधवंत (वय 11 वर्षे, रा. देवधानोरा, ता. कळंब) असे तलावात बुडुन मृत्‍यू झालेल्‍या मुलाचे नाव आहे.  दि. ५ रोजी दुपारी १.३० वाजण्याच्या सुमारास देवधानोरा येथील अभिजीत बुधवंत व भाऊ सोनू उत्रेश्वर बुधवंत (वय १४) हे दोघे आपल्या आईसोबत धुणे धुण्यासाठी देवधानोरा जवळील बोरगाव (बु) शिवारातील साठवण तलावाजवळ गेले होते. आई धुने धुत असताना अभिजीत व सोनू हे दोघे पोहण्यास गेले. परंतू उशिरापर्यंत अभिजीत पाण्याच्या बाहेर न आल्याने आईने आरडा ओरड केला. पण तो बाहेरच आला नाही. हा सर्व प्रकार गावात कळताच गावातील बोरगाव (बु) व देवधानोरा गावातील नागरिकांनी शोधण्याचा प्रयत्न केला. परंतू अभिजीत सापडलाच नाही. दुस-या दिवशीही दि. ६ रोजी सकाळपासुनच शोधकार्य सुरु असताना १२.३० च्या दरम्यान त्याचे प्रेत तलावात सापडले. त्याचे शवविच्छेदन शिराढोण ग्रामीण रुग्णालयात करण्यात आले.
    दि. ६ रोजी सकाळी घटनेची माहिती मिळताच कळंबचे प्र. तहसीलदार डि. एम. शिंदे हे आपल्या लवाजम्यासह घटनास्थळी उपस्थित होते. यावेळी घटनास्थळी पोलिस पाटील राजाभाऊ वाघमारे, पांडूरंग मस्के, तलाठी आर. आर. दमकोंडवार, सहाय्यक पोलिस निरिक्षक सुर्यकांत कोकणे, बीट अंमलदार चव्हाण, तलाठी एस. एस. पाचभाई, एस.एस. पवार आदि उपस्थित होते. या घटनेबद्दल गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
 
Top