अकोला : शेतक-यांना पीक कर्ज हा मोठा आधार असल्यामुळे अधिकाधिक पीक कर्ज वाटपावर सरकारने भर दिला असून 80 हजार कोटी असलेले पीक कर्ज वाटप आता 7 लाख कोटी पर्यंत दिले जात आहे. येत्या काही वर्षात ते 15 लाख कोटी पर्यंत नेण्याचे उद्दिष्ट असल्याचे केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी सांगितले.

अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष कै.डॉ.वा.रा. उर्फ अण्णासाहेब कोरपे यांच्या पूर्णाकृती प्रेरणा शिल्पाचे अनावरण आणि रुपे केसीसी डेबीट कार्डचा शुभांरभ श्री. पवार यांच्या हस्ते झाला. यावेळी केंद्रीय अवजड उद्योगमंत्री प्रफुल्ल पटेल, वनमंत्री डॉ. पतंगराव कदम, नागरी पुरवठामंत्री अनिल देशमुख, बांधकाममंत्री जयदत्त क्षीरसागर, खासदार संजय धोत्रे, अकोला आणि वाशिम जिल्ह्यातील आमदार व बँकेचे संचालक, सहकारातील जिल्ह्यातील नेते, शेतकरी सभासद मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.

राज्यात यशस्वीपणे सहकारी बँक चालविणाऱ्या बँकांमध्ये शतकपूर्ती केलेल्या अकोला सहकारी बँकेचा श्री. पवार यांनी विशेष गौरव केला. सहकारात सभासदांना अधिक मजबूत करण्यासाठी सहकार कायद्यात मोठे बदल केंद्र सरकारने केले आहेत. महाराष्ट्र शासनानेही या कायद्यातील बदल स्वीकारल्यामुळे सहकाराला नवे बळ मिळेल, असे प्रतिपादनही श्री. पवार यांनी यावेळी केले.

शेतकऱ्यांना अतिशय कमी दरात मिळणारे पीक कर्जाचे व्याज अजून कमी करण्याचा आपला प्रयत्न असल्याचे सांगून गरीबातल्या गरीबाला अन्न मिळाले पाहिजे. अन्न सुरक्षा कायद्यामुळे ते आता मिळणार आहे. मात्र शेतकऱ्यांच्या शेतीलाही योग्य भाव मिळाला पाहिजे, यासाठी आमचे प्रयत्न असल्याचेही श्री. पवारांनी यावेळी सांगितले.

विदर्भात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे, आपण स्वत: त्याची पाहणी केली आहे. केंद्रीय पथकांनी देखील या भागाची पाहणी केली आहे. राज्य शासनाकडूनही त्यांचा सविस्तर अहवाल आला आहे. परवा आपल्या अध्यक्षतेखाली या संदर्भात होणाऱ्या बैठकीत अतिवृष्टीसंदर्भातील नुकसान भरपाई आपण योग्य प्रमाणात देऊ, असे आश्वासन श्री. पवार यांनी विदर्भातील शेतकऱ्यांना दिले.

डॉ. कदम म्हणाले, राज्यात कधी कोरड्या तर कधी ओल्या दृष्काळाचे संकट उभे राहत आहे. अशा परिस्थितीत शासन खंबीरपणे जनतेच्या पाठीशी उभे आहे. गेल्या वर्षीच्या कोरड्या दृष्काळात जनतेला सावरले. या हंगामात पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केले. यावेळीही शासन धावून आले. मृत जनावरांसाठी, पडलेल्या घरांसाठी तात्काळ मदत दिली. शेतीच्या नुकसानीबाबत थोड्याच दिवसात मदत दिली जाईल.

श्री. पटेल, श्री. क्षीरसागर यांनीही यावेळी विचार मांडले. अकोला ‍जिल्हा मंध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष डॉ. संतोषकुमार कोरपे यांनी प्रास्ताविक केले. तत्पूर्वी अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अनेक वर्षे अध्यक्ष राहिलेले आणि सहकारात मोठे योगदान दिलेले कै. अण्णासाहेब कोरपे यांच्या पूर्णाकृती प्रेरणा शिल्पाचे मान्यवरांच्या उपस्थितीत अनावरण करण्यात आले.
 
Top