मुंबई : ग्रामीण भागात आरोग्य सेवेचे जाळे घट्ट करण्यासाठी आरोग्य विभागामार्फत वर्ग एक ते तीन संवर्गातील 5600 रिक्त पदांची भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. गेल्या तीन वर्षातील ही सर्वात मोठी भरती प्रक्रिया असून त्यामुळे सामान्यांना अधिक दर्जेदार सेवा मिळण्यास मदत होईल, अशी माहिती आरोग्यमंत्री सुरेश शेट्टी यांनी दिली.

याबाबत अधिक माहिती देतांना आरोग्यमंत्री शेट्टी यांनी सांगितले की, राज्यभर आरोग्य संस्थांचे जाळे मोठ्या प्रमाणावर पसरले आहे. त्याच बरोबरच नवीन बृहत आराखड्यानुसार नव्याने आरोग्य संस्थांच्या उभारणी बरोबरच नवीन पदे देखील निर्माण झाली आहेत तसेच आरोग्य विभागमार्फत विविध लोकोपयोगी योजना सुरू करण्यात आल्याने तातडीने डॉक्टरांची तसेच विविध संवर्गातील पदांवरील सहाय्यकांची आवश्यकता भासत आहे. त्यामुळे ही भरती प्रक्रिया तातडीने राबविण्यात येत आहे.
      या 5600 पदांमध्ये वर्ग एक संवर्गाची 1881 पदे आहेत त्यात जनरल मेडीसीन 110, बालरोग तज्ज्ञ 289, शल्यचिकीत्सक 105, स्त्री रोग तज्ज्ञ 211, भूलतज्ज्ञ 408, अस्थीरोग तज्ज्ञ 42, नेत्ररोग तज्ज्ञ 28, क्ष किरण तज्ज्ञ 4, मानसोपचार तज्ज्ञ 14, रक्त विघटक तज्ज्ञ 27, एमबीबीएस तज्ज्ञ 643 अशी 1881 पदे सरळसेवेने भरली जाणार आहे. त्याच बरोबर वर्ग तीन संवर्गाच्या औषध निर्माण अधिकारी, प्रयोगशाळा सहायक, आरोग्य कर्मचारी, रक्तपेढी तंत्रज्ञ, परिचारीका अशी 20 विविध संवंर्गातील 3781 पदे भरण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे, असेही शेट्टी यांनी सांगितले.
      राज्याच्या आरोग्य क्षेत्रात एवढ्या मोठ्या प्रमाणावर भरती प्रक्रिया राबविण्याची ही पहिलीच वेळ असून त्यामुळे सामान्यांना दर्जेदार आणि अधिक गतिमान आरोग्य सेवा उपलब्ध होण्यास मदतच होणार आहे. विभागात भरती प्रक्रिया करतांना ऑनलाईन पद्धतीचा वापर केला जात असून ही प्रक्रिया अधिक गतीमान आणि पारदर्शक होण्यास मदत मिळणार असल्याचेही शेट्टी यांनी सांगितले.
 
Top