मुंबई - ‘शिवसेनेत कोणत्याही प्रकारची बेबंदशाही येऊ देणार नाही आणि कोणत्याही दडपणाला भीक घालणार नाही,’ या शब्दात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी रविवारी मनोहर जोशींसह बंडाच्या तयारीत असलेल्या पक्षातील नेत्यांना ठणकावले. ‘जोपर्यंत शिवसैनिकांचा माझ्यावर विश्वास आहे तोपर्यंत मी पक्षप्रमुखपदी राहीन, जेव्हा त्यांचा विश्वास उडेल तेव्हा मी पक्षाचे काम सोडून देईन’, असे सांगत त्यांनी शिवसैनिकांसमोर कणखरपणाचे दर्शनही घडवले.
 
शिवसेनेचा 48 वा दसरा मेळावा रविवारी शिवाजी पार्कवर आयोजित करण्यात आला होता. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतरचा हा पहिलाच मेळावा असल्याने उद्धव ठाकरे काय बोलतात याकडे सगळ्यांचे लक्ष लागलेले होते. शिवसैनिकांची गर्दीही बर्‍यापैकी होती. या वेळी उद्धव यांनी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर चौफेर टीका केली.
    ते म्हणाले की, दसरा मेळावा हा आमची सांस्कृतिक परंपरा असून धार्मिक कार्यक्रम आहे. आमची परंपरा मोडीत निघावी म्हणून काही जण पाण्यात देव बुडवून बसले होते, परंतु न्यायालयाने आम्हाला परवानगी दिल्याने आम्ही त्यांचे आभारी आहोत. मात्र सभेला गर्दी होईल की नाही याची मला धास्ती होती, परंतु आज गर्दी पाहून शिवसैनिकांचा अजूनही माझ्यावर विश्वास आहे याची खात्री पटली.
    उद्धव म्हणाले की, राज्याचे काम ठप्प झालेले आहे. मुख्यमंत्री काहीही काम करीत नाहीत. फायलींवर बसून असतात. त्यांना काही सांगितले की, ‘पाहतो, बघतो, करतो’ एवढेच म्हणतात. त्यांचे दुकान बंदच आहे. ठाणे क्लस्टरसाठी त्यांना भेटलो पण काही नाही. उद्या जर एखादी दुर्घटना झाली तर त्याला राज्य सरकार जबाबदार असेल.’ थोडे उशिराच व्यासपीठावर आलेले मनोहर जोशी यांचे उद्धव ठाकरेंनी स्वागत केले. मात्र कार्यकर्त्यांच्या घोषणाबाजीनंतर क्षणार्धात जोशींनी मेळाव्यातून काढता पाय घेतला.
    ‘अंधर्शद्धा विधेयक जर हिंदूंच्या मुळावर येणार असेल तर त्याला आम्ही विरोध करू, या देशात हिंदुत्वाबद्दल बोलणारा कोणीही नाही. मोदींचे नाव घेतले की आम्हाला धर्मांध बोलतात, परंतु हिंदुत्वाच्या विचारापासून आम्ही मागे हटणार नाही. बाळासाहेबांकडे सत्ता असती तर पाकिस्तान आणि बांगलादेशातही हिंदू राहिले असते. आज पाकिस्तानी आणि बांगलादेशी आपल्या देशात घुसखोरी करीत आहेत त्यांना कोणी रोखत नाही,’ असेही उद्धव यांनी ठणकावले.
    ‘मोदींना पंतप्रधानपदाचे उमेदवार जाहीर होताच शरद पवारांनी ‘उतावळा नवरा’ म्हटले. मात्र त्यांनाच ‘थकलेला नवरा सगळीकडे बाशिंग’ असे म्हटले पाहिजे. क्रिकेटपटूंसोबत त्यांचे फोटो येतात, शेतकर्‍यांबरोबर कधी आला नाही. आता ‘एमसीए’च्या निवडणुकीसाठी उभे आहेत. दिवट्या पुतण्याबद्दल ते बोलत नाहीत. सिंचनात घोटाळा झाला. पवार म्हणतात, ‘आरोपाची फॅशन आली आहे’, मग न्यायालयात चौकशी का करीत नाही?. अजित पवार दोषी असतील तर त्यांना तुरूंगातच पाठवले पाहिजे.
 
Top