पांगरी (गणेश गोडसे) : वानेवाडी (ता. बार्शी) येथील स्वस्त धान्य दुकानदाराने गत सहा महिन्यात धान्य वाटपात पन्नास हजार रूपयांचा अपहार करून शासनाची फसवणुक केल्याची घटना उघडकीस आली असुन सोमवार दि. 28 ऑक्‍टोबर रोजी महसुल खात्याचे कर्मचारी व पांगरी पोलिस यांनी संयुक्तपणे छापा टाकुन बनावट शिधापत्रिका व इतर कागदपत्रांसह स्वस्त धान्य दुकानचालकास अटक केली आहे.
    हनुमंत नारायण यादव (वय 63, रा. वाणेवाडी, ता.बार्शी) असे अटक करण्‍यात आलेल्याचे नाव आहे. ऐन दिवाळी सनाच्या तोंडावर बार्शी तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानाचा घोटाळा उघडकीस आल्यामुळे अनेकांचे धाबे दनानले असुन दुकानचालकांमध्ये खळबळ उडाली आहे. प्रकाश पांडुरंग कुलकर्णी (रा.ज्ञानेश्‍वर नगर बँक कॉलनी सोलापुर, पुरवठा निरीक्षक बार्शी तहसिल कार्यालय) यांनी याबाबत पांगरी पोलिसात फिर्याद दिली आहे. सोमवारी मध्यरात्रीपर्यंत गुन्हा दाखल करण्‍याची प्रक्रिया सुरू होती.
    बार्शी तहसिल कार्यालयाचे पुरवठा निरीक्षक प्रकाश कुलकर्णी यांनी पांगरी पोलिसात दिलेल्या फिर्यादित म्हटले आहे की, वाणेवाडी येथील स्वस्त धान्य दुकान क्रमांक 116 चे चालक हणुमंत नारायण यादव यांच्या स्वस्त धान्य दुकानासंदर्भात 20 ऑक्टोंबर रोजी तहसिलदारांकडे ग्राहकांनी व ग्रामस्थांनी तक्रारी अर्ज दिला होता. तहसिलदारांनी ग्रामस्थांच्या तक्रारी अर्जावर कार्यवाही करण्‍यासाठी पुरवठा निरीक्षकांना आदेश दिले होते. बार्शी तहसिल कार्यालयाच्या महसुल व पुरवठा विभागाच्या पथकाने पांगरी पोलिसांसह काल वाणेवाडी येथील स्वस्त धान्य दुकानी अचानक छापा टाकुन दुकानाची पाहणी केली असता दुकानात माल निदर्शनास आला नाही. पथकाच्या सदस्यांनी नंतर दुकानचालक यादव यांच्या घराची तपासणी करून घरातुन स्टॉक रजिस्टर पावती पुस्तक, ग्राहक नोंद रजिस्टर, विक्री रजिस्टर व ग्राहकांच्या नावावर असलेल्या व स्वताःजवळ बाळगलेल्या अट्टावीस विविध प्रकारच्या शिधापत्रिका ताब्यात घेतल्या आहेत.
     मे 2013 ते ऑक्टोंबर 2013 या सहा महिन्यांच्या कालावधीत स्वस्त धान्य दुकान चालक हनुमंत यादव यांनी वेळोवेळी सरकारी योजनेतील स्वस्त धान्य सरकारी नियमाप्रमाणे शासकीय गोदाम बार्शी येथुन उचलुन वाणेवाडी गावातील शिधापत्रिकाधारकांना वाटप करणे आवश्यक असताना सदर धान्य शिधापत्रिकाधारकांना वाटप न करता ते धान्य शिधापत्रिकाधारकांना वितरीत केल्याच्या बनावट पावत्या व बनावट रेशनकार्ड तयार करून व त्यामध्ये खाडाखोड करून ते रेशनकार्ड स्वताःजवळ बाळगुन सरकारी स्वस्त धान्य स्वताःच्या आर्थिक फायदयाकरीता काळया बाजारात अधिक चढया दराने विक्री करून सुमारे पन्नास हजाराचा शासकीय रकमेचा अपहार केला आहे. प्रकाश कुलकर्णी यांच्या फिर्यादिवरून हनुमंत यादव या दुकानचालकांविरूदध फसवणुक व जिवनावश्यक वस्तु कायदयान्वये सोमवारी रात्री उशिरा गुन्हा नोंद करण्‍यात आला आहे. अधिक तपास पांगरी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शरद मेमाणे हे करीत आहेत.
 
Top