पांगरी (गणेश गोडसे) : कशासाठी पैशासाठी, कशासाठी पोटासाठी असाच कांहिसा पण पहाणा-यांच्या अंगावर थरार आणुन अनेकांना तोंडात बोटे घालायला लावणारे चित्तथरारक असे प्रकार सर्रास विविध ठिकाणी बाजारपेठा, बसस्थानकावर पहावयास मिळतात. आपल्या रोजीरोटीच्या प्रश्‍नामुळे व पोटाची खळगी भरण्‍यासाठी गावोगांव भटकुन लोकांना मनोरंजनाचे कार्यक्रम दाखवुन त्यातुन मिळणा-या पैशातुन अर्थाजन करणा-या बाल कलाकारांची कहाणी. आपल्या जिवावर बेतणारे प्रयोग करून लोंकांची करमणुक करत पोटातील दुःख लपवत चेह-यावर हास्य उमटवुन प्रेक्षकांची वाहवा मिळवणा-या बालकलाकारांसह या भटक्या लोकांच्या प्रश्‍नाचे काय? अशा भेदक पण अनेकांच्या हदयाला पिळ टाकणा-या या प्रश्‍नाची उकल कोण करणार?
     'ढमाढम ढोल रं, झमाझम झांजरी नाचतो डोंबारी, रं नाचतो डोंबारी. उदयाच्या पोटाची काळजी कशाला, आभाळ पांघरू, दगड उशाला, गाळुणी घाम, असा मागुया भाकरी, नाचतो डोंबारी' या काव्यपंक्तीप्रमाणेच खरोखरच या कलाकार समाजाची दैनंदिनी आहे. दोरीवर आपल्या शरिराचा समतोल राखत बाटलीवर चालुन दाखवण्‍याच्या मन अचंबित करणारे व जिवाशी खेळणारे प्रयेग करून जगण्‍यासाठी त्यांना समाजापुढे हात पसरावे लागतात. राज्यभर विखुरला गेलेला असल्याच्या या कलाकरांच्या समाजाचेही सर्व प्रश्‍नही त्यांच्याप्रमाणेच अस्ताव्यस्त होऊन विखुरलेल्या अवस्थेत पडलेले आहेत. परंपरागत वास्तव कला अंगात घेऊनच जन्माला येणा-या या कलाकारांच्या विविध प्रश्‍नांकडे कोण गांर्भियाने पाहणार हाच मोठा गांर्भियाचा प्रश्‍न आहे. एरव्ही मतासाठी समाजाच्या मागण्‍यांची पुर्तता करण्‍यासाठी प्रयत्न करू असे म्हणणारे राजकरणीही या असंघटीत कलाकारांसाठी कांही बोलण्‍यास तयार नाहीत. ज्यांच्याकडुन परतावा मिळतो त्यांच्यासाठीच कांहीतरी करणं ही समाजाची माणसिकताच बनलेली असल्यामुळे शासन प्रशासनासह राजकारण्‍यांच्या मदतीची खरी गरज असलेल्या या कलाकारांच्या प्रश्‍नाकडे सर्वांकडुनच सोईस्करपणे दुर्लक्ष केले जात आहे.
      शिक्षणप्रवाहापासुन कोसो दुर असलेल्या व अक्षरांचीही साधी ओळख होऊ न शकलेल्या या कलाकारांना व त्यांच्या पाल्यांना शिक्षण प्रवाहात आणुन त्यांना शिक्षणाचे डोस पाजणे नितांत गरजेचे आहे. कारण शिक्षण म्हणजे वाघिनीचे दुध आहे असे म्हटले जाते. जेव्हा या समाजाला शिक्षण प्रवाहात आणुन त्यांना वाघिनीच दुध पाजण्‍यासाठी प्रयत्न केले जातील तेव्हाच हा समाज ख-या अर्थाने समाजाच्या मुख्य प्रवाहात येणार आहे. सतत समाजातच वावरणा-या मात्र समाजातील सोई सुविधापासुन कित्येक मैल दुरवर असलेल्या या समाजासाठी शिक्षण हा खुप मोठा आधार बनणार आहे.
 
Top