सोलापूर : नाशिकमध्‍ये होणा-या कुंभमेळ्याच्‍या नियोजनाप्रमाणे पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास आराखडा तयार करुन पंढरपूरचा विकास करण्‍याचे प्रयत्‍न सुरु आहेत. यासाठी केंद्र शासनाकडून निधी मिळविण्‍याचेही प्रयत्‍न होत असल्‍याची माहिती सोलापूर जिल्‍ह्याचे पालकमंत्री ना. दिलीपराव सोपल यांनी दिली.
    जिल्‍हाधिकारी कार्यालयाच्‍या सभागृहात सोमवारी पालकमंत्री सोपल यांच्‍या अध्‍यक्षतेखाली पंढरपूर विकास प्राधिकरणाची बैठक घेण्‍यात आली. यावेळी जिल्‍हाधिकारी डॉ. प्रवीण गेडाम, आ. भारत भालके, आ. बबनदादा शिंदे, कल्‍याणराव काळे, अप्‍पर पोलीस अधिक्षक तुषार जोशी, पंढरपूरच्‍या नगराध्‍यक्षा सुनीता भालेराव, जि.प.चे मुख्‍यकार्यकारी अधिकारी तुकाराम कासार यांच्‍यासह विविध खात्‍यांचे खातेप्रमुख व वारकरी संप्रदायाचे प्रतिनिधी उपस्थित होते.
    बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना ना. सोपल म्‍हणाले, पंढरपुरात येणा-या प्रत्‍येक भाविकास सर्वोत्‍तम सुविधा मिळाव्‍यात यासाठी प्राधिकरणाच्‍या माध्‍यमातून प्रयत्‍न करण्‍यात येत आहेत. शहराबाहेरील दहा किलोमीटर अंतरचे नियोजन व विकास आराखडा त्‍यादृष्‍टीने करण्‍यात येत आहे. नियोजित सुविधेसाठी लागणा-या जागे संदर्भातचे नकाशे व इतर आराखडा तयार करण्‍याचे काम अंतिम टप्‍प्‍यात आले असून येत्‍या महिन्‍याभरात हे काम संपणार असल्‍याचे त्‍यांनी यावेळी सांगितले.
        नदीशुध्‍दीकरणासाठी नदी पात्राच्‍या दोन्‍ही बाजूस शुध्‍दीकरणाचे उपाययोजना करण्‍यात येत आहेत. एकात्मिक सुविधेसाठी आवश्‍ययक असणा-या जागेसंदर्भातही राज्‍य शासनाकडे पाठपुरावा करण्‍यात येणार आहे. नाशिक, हरिद्वार, उज्‍जैन, नांदेड आदी तीर्थक्षेत्रांप्रमाणे पंढरपूर शहराचा विकास आराखडा तयार करुन यासाठी निधी मिळविण्‍यात येणार असल्‍याचे सोपल यांनी सांगितले.
 
Top