सोलापूर -: सोलापूर-मुंबई एक्सप्रेस  सुरु करण्याबाबत 35 वर्षापासूनची प्रवाशांची मागणी होती. केंद्रीय गृहमंत्री सुशिलकुमार शिंदे यांच्या प्रयत्नामुळे सुरु होत असल्याचे प्रतिपादन केंद्रीय रेल्वेमंत्री मल्लिकार्जून खरगे यांनी केले.
    सोलापूर-मुंबई एक्सप्रेस या रेल्वेचा शुभारंभ
रेल्वेमंत्री मल्लिकार्जून खरगे यांच्‍या हस्ते झाला. त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रीय गृहमंत्री सुशिलकुमार शिंदे उपस्थित होते. याप्रसंगी आ. दिलीप माने, आ. प्रणिती शिंदे, महापौर श्रीमती अलका राठोड, माजी मंत्री सिध्दराम म्हेत्रे, मध्य रेल्वेचे महाप्रबंधक बी. पी. खरे, जिल्हाधिकारी डॉ. प्रविण गेडाम, महापालिका आयुक्त चंद्रकांत गुडेवार आदिंची प्रमुख उपस्थिती होती.
    यावेळी बोलतांना खरगे म्हणाले की, या 12 डब्याच्या गाडीसाठी सुमारे 22 कोटी रुपये खर्च आला आहे. सुशिलकुमार शिंदे साहेबांनी ही सोलापूरकरांना दिलेली भेट असल्याचे सांगितले. सोलापूर- यशवंतपूर या रेल्वे गाडीचा यापूर्वीच शुभारंभ करण्यात आला. ती गाडी आठवड्यातुन 3 दिवस होती ती आता दररोज धावत आहे व ही गाडी चांगली चालत आहे. त्याप्रमाणे सोलापूर मुंबई गाडीही चांगली चालेल प्रवाशांना सोईबरोबरच रेल्वे विभागासही फायदा होईल असा विश्वास खरगे यांनी व्यक्त केला.
    रेल्वे ही भारतामध्ये सर्वांना जोडणारी आहे. कन्याकुमारी ते कश्मिर रेल्वे सेवा सुरु करण्याचा प्रयत्न असल्याचेही श्री खरगे यांनी सांगितले. रेल्वेने दररोज 2 कोटी 25 लाख लोक प्रवास करतात. अशा या रेल्वेची सुरक्षा करणेही आपले सर्वांचे कर्तव्य असल्याचे सांगितले.
    विजापूर - मंगळवेढा रेल्वे मार्गाचे लवकरच सर्वेक्षणाचे काम केले जाईल. सोलापूर रेल्वे स्टेशनचा मास्टर प्लॅन व रेल्वे विभागाच्या विविध मागण्यांकडे विशेष लक्ष देऊन पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जाईल अशी ग्वाही श्री. खरगे यांनी दिली.
    याप्रसंगी बोलतांना केंद्रीय गृहमंत्री सुशिलकुमार शिंदे म्हणाले की, दिवाळीपूर्वी सोलापूर-मुंबई ही गाडी सुरु करुन सोलापूरकरांना दिवाळी भेट देण्याची इच्छा होती ती रेल्वे मंत्री खरगे यांच्यामुळे आज पूर्ण होत आहे. 30 वर्षापूर्वी सुरु झालेल्या सिध्देश्वर एक्सप्रेसला आरक्षण मिळत नव्हते त्यामुळे अन्य गाड्यांनी प्रवास करावा लागत असे. सिध्देश्वरचे डबे व प्रथम श्रेणी वाढविली पण गर्दी कमी होत नव्हती. त्यामुळे या नवीन रेल्वेची रेल्वे मंत्र्यांकडे बजेटच्या वेळी मागणी केली होती. त्यानुसार ही गाडी जाहीर झाली व. खरगे यांनी लक्ष दिल्यामुळे ही गाडी आज सुरु होत असल्याचे सांगितले.
    सोलापूर-अजमेर या मार्गावर ही गाडी लवकर सुरु करण्यात यावी. तसेच सोलापूर-नागपूर व सोलापूर-जळगाव या मार्गावरही रेल्वे सुरु व्हावी अशी मागणी केली. तसेच पंढरपूर-मंगळवेढा-विजापूर रेल्वे मार्गाचे लवकर सर्वेक्षण व्हावे. मध्य रेल्वे विभागाचे सोलापूर येथे चांगले स्टेशन व्हावे अशी मागणी गृहमंत्री शिंदे यांनी केली.
    सोलापूरला नवीन 200 बसेस आले पाहिजेत यासाठी पाठपुरावा सुरु आहे. तसेच वातानुकुलीत व्हाल्वोच्या 20 बसेसही मिळाल्या आहेत. रस्तेही चांगले होत आहेत. त्याचप्रमाणे पंढरपूरचाही नवीन आराखडा करण्यात येत असल्याचे गृहमंत्री शिंदे यांनी सांगितले.
    प्रारंभी रेल्वेचे महाप्रबंधक खरे यांनी ब-याच वर्षापासूनची सोलापूरकरांची मागणी असलेली ही नवीन रेल्वे आज सुरु होत आहे. आठवड्यातून सहा दिवस ही रेल्वे धावणार आहे. त्यामुळे प्रवाशांना याचा चांगला लाभ होईल. तसेच या मार्गावरील दुपदरी करणाचे कामही दोन वर्षात पूर्ण होईल असे सांगितले.
    याप्रसंगी महापौर अलका राठोड यांचे समयोचित भाषण झाले.
 
Top