स्‍नेहा गवई
पिंपरी : येथील डॉ.डी.वाय. पाटील महाविद्यालयातील एका विद्यार्थिनीने सातव्‍या मजल्‍यावरुन उडी घेऊन आत्‍महत्‍या केल्‍याची घटना शुक्रवार रोजी सकाळी सव्‍वा सात वाजण्‍याच्‍या सुमारास घडली. दरम्‍यान, महाविद्यालयाच्‍या बाहेरील मुलाकडून होणा-या छेडछाडीला कंटाळून आत्‍महत्‍या केल्‍याची चर्चा होत आहे.
    स्‍नेहा दिलीप गवई (वय 23, रा. नागपूर, हल्‍ली मुक्‍काम संत तुकारामनगर) असे आत्‍महत्‍या केलेल्‍या विद्यार्थिनीचे नाव आहे. संत तुकारामनगरमध्‍ये असलेल्‍या डॉ.डी.वाय. पाटील वरिष्‍ठ महाविद्यालयात बीबीएसच्‍या तिस-या वर्षात स्‍नेहा गवई ही शिक्षण घेत होती. स्‍नेहा आज शुक्रवार रोजी सकाळी सात वाजण्‍याच्‍या सुमारास महाविद्यालयात आली. त्‍यानंतर तिने सव्‍वा सातच्‍या सुमारास महाविद्यालयाच्‍या सातव्‍या मजल्‍यावरुन तिने उडी घेतली. तिला त्‍वरित महाविद्यालकडून डॉ. डी.वाय. पाटील रुग्‍णालयात दाखल करण्‍यात आले. मात्र गंभीर जखमी झाल्‍याने तिचा मृत्‍यू झाला.
    दरम्‍यान, घटनेची माहिती मिळताच पिंपरी पोलिस घटनास्‍थळी दाखल झाले. स्‍नेहा हिचे वडील नागपूर ग्रामीण पोलीस ठाण्‍यात पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत आहेत.
    स्‍नेहा हिला गेल्‍या काही दिवसांपासून कॉलेजच्‍या बाहेरील एक मुलगा वारंवार त्रास देत होता. मात्र, तिने याबद्दल महाविद्यालयाच्‍या प्राचार्याकडे कोणतीही तक्रार दिलेली नव्‍हती, अशी माहिती तिच्‍या मैत्रिणींनी दिली असल्‍याचे समजते. स्‍नेहा हिच्‍याकडे पोलिसांना तिचा मोबाईल मिळाला. त्‍यावर ब-याचदा एका व्‍यक्‍तीचे फोन आलेले होते. त्‍यामुळे स्‍नेहा हिच्‍या     आत्‍महत्‍येप्रकरणी उलटसुलट चर्चा सुरु आहे. मात्र, स्‍नेहाच्‍या आत्‍महत्‍येचे नेमके कारण अद्याप स्‍पष्‍ट होऊ शकले नाही.
 
Top