पांगरी (गणेश गोडसे)  :  रविवार दि. 27 ऑक्‍टोबर रोजी बार्शी तालुक्‍यातील उक्कडगांव येथे संकल्प बहुउद्देशिय सेवा संस्था लातुर संचलित डॉ. चंद्रभानु सोनवणे कनिष्ठ महाविद्यालय उक्कडगांव येथील महाविद्यालयाच्या वास्तुचे उदघाटन व अभासी वर्गाच्या इमारतीच्या पायाभरणी सोहळयाच्या कार्यक्रम पार पडला. 
         यावेळी कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी माजी मंत्री दिलीपराव देशमुख हे होते. तर पंशुवर्धन, दुग्धविकास व मत्‍स्‍यव्‍यवसाय मंत्री तथा उस्मानाबादचे पालकमंत्री ना. मधुकररावजी चव्हाण, पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा सोलापुरचे पालकमंत्री ना. दिलीपराव सोपल, शिक्षक आमदार विक्रम काळे, संस्थाध्यक्ष संजीव सोनवणे, सचिव अविनाश मोरे, कार्यकारी अध्यक्ष मोईज शेख, डॉ.विष्णुपंत गोरे, शरद निलंगेकर, बसवेश्‍वर भुसे, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे चेरमन एस. आर. देशमुख, प्राचार्य विशाल जमाले, तेरणाचे अध्यक्ष लक्ष्मण मोरे, भागवत धस, सुरेश बिराजदार, विक्रमसिंह चव्हाण, रामदास पवार, सतिश पाटील, सहाय्यक पोलीस शरद मेमाणे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
      सोलापुरचे पालकमंत्री दिलीप सोपल यावेळी बोलताना म्हणाले की, या संस्थेने जागेची निवड अतिशय नियोजनबध्‍द पदधतीने केली असुन यापुढे ग्रामीण भागातुन व या डोंगरद-यांमधुन डॉक्टर, इंजीनियर यासह समाज घडवणारे शिक्षक तयार होऊन त्याचा समाजाच्या विकासाला मोठा हातभार लागुन विदयार्थी तयार होणार आहेत. तसेच हे संकुल हे जिवन शिक्षण देणारे शैक्षणिक संकुल ठरेल असे म्हणुन त्यांनी आपल्या शालेय जिवनातील आठवणींना उजाळा दिला.
    उस्मानाबादचे पालकमंत्री मधुकरराव चव्हाण यावेळी म्हणाले की, पुर्वीच्या काळात गुरूकुल पदधतीची सोय असायची. गुरूकुल शिक्षणपदधतीमधुन अनेक विदयार्थी तयार होत असत. त्याच धर्तीवर डोंगराच्या कुशित शाळेची निर्मिती करून विदयार्थांच्या शैक्षणिक प्रगतीबरोबरच त्याची शारिरीक वैयक्तिक प्रगतीही साधन्याचे प्रयत्न होत असल्याबदल समाधान व्यक्त करून संस्थेला आवश्यक ती मदत करण्‍याचे आश्‍वासन दिले.
    आपल्‍या अध्‍यक्षीय भाषणात बोलताना दिलीपराव देशमुख म्‍हणाले की,  चांगले झाड येण्‍यासाठी जसे आपण चांगल्या रोपवाटीकेतील रोपे निवडतो तेव्हाच भविष्यात चांगली फळे, फुले मिळू शकतात. त्यासाठी अगोदर निवड महत्वाची ठरते. म्हणुन निवडताना चांगलेच निवडणे गरजेचे असते व खेळासह शिक्षणाची सांगड घालुन विद्यार्थी घडवण्‍याची जबाबदारी चांगल्या पध्‍दतीने पार पाडली जात असल्याचे प्रतिपादन माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांनी केले.
    यावेळी शिक्षक आमदार विक्रम काळे यांचेही समायोचित भाषण झाले. कार्यक्रमाची सुरूवात सरस्वती व डॉ.चंद्रभानु सोनवणे यांच्या प्रतिमा पुजनाने करण्‍यात आली. संस्थाध्यक्ष संजीव सोनवणे यांनी विद्यालयासंदर्भात माहिती देऊन भविष्यात काय करण्‍यात येणार आहे याविषयी विवेचन केले. कार्यक्रम यश्स्वी करण्‍यासाठी प्रा.विशाल गरड यांच्यासह संस्थेतील इतर प्राध्यापक शिक्षक कर्मच-यांनी परिश्रम घेतले. आभार संस्थेचे सचिव अविनाश मोरे यांनी मानले.
 
Top