बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) : दलित चळवळीतील कार्यकर्ते केवळ पैशासाठी आंबेडकरी विचारांची मोडतोड करीत आहेत. दलितांच्या न्याय हक्काच्या प्रश्‍नावर कार्यकर्ते मांडवल्या करीत असल्याने आंबेडकरी चळवळ बदनाम होत आहे व ही गोष्ट दलित समाजाला मुळीच परवडणारी नाही त्यामुळे विचारी, प्रामाणिक अन् स्वाभिमानी कार्यकर्त्यांची आज गरज आहे, असे मत दलित महासंघाचे संस्थापक मच्छिंद्र सकटे यांनी व्यक्त केले.
    बार्शी येथील शासकिय विश्रामगृहावर पत्रकारांशी वार्तालाप करतांना ते बोलत होते. यावेळी दलित महासंघाचे जिल्हाध्यक्ष सुनिल अवघडे, शहराध्यक्ष सुनिल झोंबाडे, तालुकाध्यक्ष निलेश खुडे, संपर्क प्रमुख अजय चव्हाण, पिंटू सरवदे, राजन मेटके, अंकुश सरवदे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
      पुढे बोलतांना सकटे म्‍हणाले, पश्‍चिम महाराष्ट्रातील दलितांची सर्वात मोठी सामाजिक संघटना आहे. फुले, शाहू, आंबेडकर, आण्णाभाऊ यांचा विचार हा या संघटनेचा पाया आहे. दलित महासंघामध्ये अनेक जातींचे लोक आहेत. यात धनगर, माळी, रामोशी, होलार, चर्मकार, नाभीक, मराठा, भटके यासह विविध जातींचे लोक आहेत. मातंग हा या संघटनेचा आधार आहे. सन १९८९-९० मध्ये दलित पँथरच्या बरखास्तीनंतर दलित समाजात संघटनात्‍मक पोकळी निर्माण झाली होती. ती या संघटनेच्या माध्यमातून भरुन काढण्याचे काम केले. आज या संघटनेला २१ वर्षे पूर्ण झाली आहेत. जो समाज कधी चळवळीत उतरला नाही अशा समाजातील हजारो तरुण कार्यकर्ते आज राज्यभर रस्त्यावर येऊन न्याय हक्कासाठी लढाई करत आहे. परंतु आज परिस्थिती खूपच बदलली आहे. सर्वत्र सुरु असलेल्या चळवळीत पैशालाचा जास्त महत्व आले आहे. या सर्व परिस्थितीतून मार्ग काढून पुन्हा एकदा दलितांच्या न्याय हक्काची लढाई तीव्र करण्याची गरज आहे. त्यादृष्टीने दलित महासंघ प्रयत्नशील आहे. आगामी लोकसभा निवडणुकांबाबत पण मला फार भिती वाटू लागली आहे कारण ४ वर्षे ११ महिने माझ्यासोबत काम करणारे कार्यकर्ते या १ महिन्यात गुलाल तिकडे चांगभले म्हणतांना दिसत असल्याने निवडणुका आल्या म्हटले की त्याची भिती वाटते. या पार्श्‍वभूमीवर मी म्हणेल लोकशाहीमध्ये मत हे केवळ मूळच नाही तर शस्त्र आहे. या शस्त्राची किंमत हजार पाचशे केली जाते, ती चुकीची प्रथा आहे. दलित समाजाला माझे आवाहन आहे की मताचा लिलाव करु नका, मत हे शस्त्र आहे अन्याय करणा-यांविरुध्द व जबाबदारीने वापरले पाहिजे, असेही ते शेवटी म्‍हणाले.
 
Top