नळदुर्ग -: शनिवार दि. 5 ऑक्‍टोबर रोजी नळदुर्ग शहरातील प्राचीन श्री अंबाबाई मंदिरात सकाळी साडे सहा वाजता घटस्‍थापना करुन देवीची यथासांग महापूजा मांडण्‍यात आली. त्‍याचबरोबर देवीच्‍या उपासक भक्‍तांकडून मोठ्या भक्‍तीभावाने आपआपल्‍या घरी घटस्‍थापना करुन नवरात्र महोत्‍सवास मोठ्या उत्‍साहाने प्रारंभ केले आहे. नळदुर्ग शहरात सहा ठिकाणी तर येथील पोलीस ठाण्‍यात हद्दीत 23 ठिकाणी शक्‍तीदेवीच्‍या मुर्तीची प्रतिष्‍ठापना करण्‍यात आली आहे. नवरात्रोत्‍सवानिमित्‍त नऊ दिवस विविध मंडळांनी देवीसमोर सांस्‍कृतिक, धार्मिक, समाज प्रबोधनपर विविध कार्यक्रमाचे भरगच्‍च आयोजन केले आहे.
    नळदुर्ग येथील अंबाबाई म‍ंदिरात घटस्‍थापना करुन पूजाअर्चा करण्‍यात आली. यावेळी शहरातील भाविक भक्‍त मोठ्या संख्‍येने उपस्थित होते. अंबाबाई मंदीर देवस्‍थान ट्रस्‍टचे अध्‍यक्ष रमेश जाधव, सचिव सुरेश गायकवाड, राजेंद्र सुतार, जिर्णोध्‍दार समितीचे अध्‍यक्ष शरद बागल, नगरसेवक नितीन कासार, अमृत पुदाले, शिवसेनेचे शहरप्रमुख संतोष पुदाले आदी प्रमुख मान्‍यवरांसह भाविक मोठ्या संख्‍येने उपस्थित होते. शहरातील इंदिरानगर, व्‍यासनगर, भवानी चौक, ब्राम्‍हण गल्‍ली, मराठा गल्‍ली आदी ठिकाणी देवीच्‍या मूर्तीची प्रतिष्‍ठापना करण्‍यात आली आहे.
 
Top