सोलापूर -: ऊस दराबाबत शेतकरी संघटनेच्या आंदोलनाची पार्श्वभूमी पाहता सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवून शांतता भंग होणार असल्याने जिल्ह्यातील सर्व साखर कारखान्यांचे सार्वजनिक व खाजगी मालमत्तेचे संभाव्य नुकसान टाळण्याकरीता व आंदोलनावर नियंत्रण ठेवण्याकरिता सोलापूर ग्रामीण जिल्ह्यातील सर्व साखर कारखान्यापासून 200 मीटरचे परिसरामध्ये कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सोलापूर जिल्ह्यातील सर्व खाजगी व सहकारी साखर कारखाने वा अन्य स्वरुपाचे कारखाने ज्यामध्ये ऊस हा कच्चा माल म्हणून वापरला जातो. अशा सर्व कारखाने परिसरात  200 मीटर (दोनशे मीटर) परिसरात पोलिसांची नजर चुकवुन, छुप्या पध्दतीने, रात्री अपरात्री मोठ्या प्रमाणात कारखाना परिसरात लावलेल्या वाहनांची टायरची हवा काढणे, टायर फोडणे, वाहनांची मोडतोड करणे, कारखान्याच्या मालमत्तेचे नुकसान करणे, कारखान्याच्या संचालकांना घेराव घालणे, वजन काटा बंद करणे यासारखे हिंसक कृत्य करण्यास बंदी घालणे जरुरीचे आहे. विजयसिंह देशमुख, अप्पर जिल्हाधिकारी, सोलापूर यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता कलम 1973 चे कलम 144 अन्वये दिनांक 23 नोव्हेंबर 2013 रोजी सकाळी 00.00 ते दिनांक 7 डिसेंबर 2013 रात्रौ 00.00 वाजेपर्यंत जिल्ह्यातील सर्व साखर कारखाने परिसरात 200 मीटर परिसरात खालील कृती करण्यास बंदी घातली आहे.
        कारखाना परिसरात तीन किंवा अधिक व्यक्तींनी एकत्र येणे, कारखाना परिसरात जवळ शस्त्रे बाळगणे, तसेच परिसरात मोबाईल फोन, सेल्यूअर फोन, पेजर घेवून जाणे व त्याचा वापर करणे, कारखाना व्यवस्थापनाच्या परवानगी शिवाय परिसरात दुचाकी अथवा चारचाकी वाहने आणणे, कारखान्याच्या दैनंदिन कामात अडथळा होईल असे कोणतेही कृत्य करणे, कारखाना परिसरात प्रक्षोभक/ चिथावणीखोर भाषण करणे, कारखाना परिसरात वाहनांना उपद्रव होईल असे कृत्य करणे, कारखान्याचे कर्मचारी वा अधिकारी तसेच ऊसतोड/ वाहतुक मजूर यांना धमकावणे, कारखान्याच्या मालमत्तेस नुकसान पोहोचविणे, परिसरात रस्ता रोको वगैरे आंदोलने करणे, सामान्य व्यक्तींचे दैनंदिन जनजीवन विस्कळीत होईल असे कोणतेही कृत्य करणे.
      सदर आदेश खालील बाबीं संदर्भात लागू राहणार नाही - कारखाना चालु ठेवण्यासाठी अत्यावश्यक असणारे स्थायी/ अस्थायी अधिकारी व कर्मचारी, बंदोबस्तावर असणारे कारखान्याचे सुरक्षा कर्मचारी, पोलीस अधिकारी कर्मचारी व अन्य शासकीय अधिकारी/ कर्मचारी, कारखाना परिसरात ज्यांचा सर्वसाधारण रहिवास अथवा व्यवसाय आहे अशी व्यक्ती, कारखाना परिसरातील सार्वजनिक वाहतुकीसाठी उपलब्ध असणा-या रस्त्यावरुन सामान्यपणे वाहतुक करणारी वाहने व त्यामधील व्यक्ती, कारखाना परिसरात असणारी शैक्षणिक संकुले व या संकुलाच्या दैनंदिन बाबींशी निगडीत असणा-या व्यक्ती, कारखाना व्यवस्थापनाने पोलिसांच्या पूर्वपरवानगीने मान्यता दिलेले कार्यक्रम.
या आदेशाचा अंमल हा दिनांक 21 नोव्हेंबर 2013 रोजी सकाळी 00.00 वाजता पासून ते दिनांक 7 डिसेंबर 2013 वाजेपर्यंत लागू राहील.
 
Top