सोलापूर -: राज्य शासनाने विविध खेळातील खेळाडूंना उत्तेजन देण्यासाठी विविध सवलती देण्याचा निर्णय घेवून उत्तेजन दिले आहे. खेळाडूंच्या कामगिरीवर भर देण्यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता तथा पालकमंत्री ना. दिलीप सोपल यांनी केले.
    सोलापूर येथील मार्कंडेय जलतरण तलाव येथे राज्यस्तरीय शालेय 14, 17 व 19 वर्षे मुले/ मुलींच्या जलतरण क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन त्यांच्या हस्ते झाले त्याप्रसंगी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. प्रविण गेडाम, सोलापूर जिल्हा जलतरण संघटनेचे अध्यक्ष जुबीन अमारिया, सचिव पवित्रा श्रीराम, छत्रपती पुरस्कार विजेते सर्वश्री पुरणचंद पुंजाल, वरभद्र रेगळ, मोतिचंद बिद्री, शरणप्पा तोरवा, हाजीमलंग नदाफ, जिल्हा क्रीडा अधिकारी श्रीमती भाग्यश्री बिले आदिंची प्रमुख उपस्थिती होती.
    यावेळी बोलतांना पालकमंत्री सोपल म्हणाले की, राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेचा मान सोलापूर जिल्ह्याला मिळाला यामध्ये विशेष आनंद आहे. या स्पर्धेतुन राष्ट्रीय स्पर्धेसाठी संघ निवडला जाणार आहे. त्या संघाने राष्ट्रीय पातळीवर विजय संपादन करावा अशा शुभेच्छा ही त्यांनी दिल्या.
    राज्य शासनाने विविध खेळातील खेळाडूंना उत्तेजन देण्यासाठी विविध स्तरावर नोकरीमध्ये आरक्षण देण्याचा निर्णय घेतला.  ऑलम्पिक व आशियाई स्पर्धेतील खेळाडूंना थेट वर्ग 1 मध्ये नेमणूक देण्याचा शासनाने निर्णय घेतला तसेच राज्य शासनाने खेळाडूंसाठी शिष्यवृत्ती, बक्षिसे देण्याचा निर्णय घेतला असला असल्याचे पालकमंत्री सोपल यांनी सांगितले. या स्पर्धेसाठी राज्यातील 9 विभागातून आलेल्या सर्व खेळाडूंचे स्वागत करुन शुभेच्छा दिल्या.
    याप्रसंगी बोलताना जिल्हाधिकारी डॉ. प्रविण गेडाम म्हणाले की, महाराष्ट्र हे जलतरणमध्ये अग्रेसर असलेले राज्य आहे. राज्यामध्ये  सोलापूर जिल्हा यामध्ये अग्रेसर असल्याचे त्यांनी सांगितले. या खेळाडूंना राष्ट्रीय पातळीवर भरघोस यश मिळावे अशा शुभेच्छा ही दिल्या.
 
Top