बार्शी : महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने राज्यस्तरीय नाट्य स्पर्धा घेण्यात येतात. यंदाच्या ५३ व्या मराठी नाट्य स्पर्धेच्या पहिल्या फेरीच्या केंद्राच्या स्वरुपात बार्शीला प्रथमच बहुमान मिळाला. औद्योगिक वसाहतीचे चेअरमन सुधीरभाऊ सोपल यांच्या हस्ते द इंटरप्रिटर या नाटकाने राज्य नाट्यस्पर्धेचा शुभारंभ झाला.
    वेळी व्यासपीठावर शिवाजी महाविद्यालयाचे प्राचार्य मधुकर फरताडे, शिक्षण महर्षी बप्पा कोरके, बार्शी शिक्षण प्रसारक मंडळाच्या संचालिका वर्षा ठोंबरे, सुरज क्रिडा व सांस्कृतिक मंडळाचे अध्यक्ष रवि कापसे, प्रा.दिपक गुंड, डॉ.नाना सामनगांवकर आदी मान्यवर उपस्थित होते. स्पर्धेचे परिक्षक म्हणून गजानन कराडे, सुरेश खानविलकर (मुंबई),  सुरेश बारसे (अमरावती) यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
    स्पर्धा यशस्वीतेसाठी नागेश अक्कलकोटे, समन्वयक रामचंद्र इकारे, सहसमन्वयक प्रताप दराडे, कृष्णा उपळकर, गणेश अक्कलकोटे, रुपेश बंगाळे, मकसूद मुल्ला, जावेद इनामदार, भालेराव, नितीन, विलास आदि परिश्रम घेत आहेत.
    मराठी रंगभूमीच्या इतिहासात अनेक दिग्गज कलाकार होऊन गेले व त्यांनी आजपर्यंत विविध महत्वपूर्ण विषयांवरील नाट्य प्रयोगांचे अत्यंत जीव ओतून सादरीकरणही केले. आजपर्यंत मराठी नाट्यसृष्टीच्या इतिहासात बार्शीचे नांवही सुवर्ण अक्षरांनी लिहीले गेले आहे.

द इंटरप्रिटर अर्थात मन,शरिराचा दुभाषी
      डॉ. समीर मोने लिखीत द इंटरप्रिटर या नाटकात मनाचा ठाव घेणारा आणि आपल्या जोडीदाराला आवश्यक असलेल्या परिणामकारक गोष्टी करणारा द इंटरप्रिटर अर्थात मनाचा आणि शरिराचा दुभाषी असा काहीसा अर्थ असलेले हे नाटक आहे. घरातील वातावरणामुळे एका मुलीच्या बालपणी (या पात्रातील कमल ) आईच्या स्वभावामुळे मुलीवर मनावर झालेले परिणाम. यातून तिच्यात निर्माण झालेली विकृती, त्या विकृतीमुळे तिचे वाढलेले शारीरिक आकर्षण यातून अनेक पुरुषांसोबत आलेला संबंध व त्यातून वाम मार्गाला लागून झालेला मनावरील विचित्र परिणाम, त्याच पध्दतीने एका मानसोपचार तज्ञाच्या (पात्रातील नांव डॉ. प्रताप देशपांडे) लग्नानंतर शारिरीक संबंधांच्या दृष्टीने पत्नीशी झालेला कलह, त्यामुळे त्याच्या मनावर झालेल्या काहीसा परिणाम, मानसोपचार तज्ञाच्या वडिलाचा स्वभाव त्यामुळे त्याच्यावर झालेला काहीसा परिणाम त्यातून उलगडणारा त्याचा मनाचा आजार, त्याला असलेला व वाढत गेलेला मोठा आजार, पती पत्नी मध्ये शरीरसंबंध महत्वाचा की व्यक्ती त्याच्या इतर अनेक गरजा महत्वाच्या यावरील प्रकाशझोत, शरीर संबंधांच्या बाबत वारण्यात येणारे अनेक शब्दप्रयोग त्याचे घटनांनुसार परिणाम दोघांच्या अभिनयात चेहर्‍यांच्या हावभावावरही स्पष्टपणे दिसून येतात. नाटकाच्या सुरुवातीपासून अगदी शेवटपर्यंत नाट्यरसिकांना खुर्चीला खिळवून ठेवणारे नाटक सादर करण्यात आले आहे. याचे दिग्दर्शन सुनिल गुरव यांनी केले आहे. सूरज केडमूर, आकाश गोरे, संगीत सागर आचलकर यांनी तर यातील कमलची भूमिका पूनम चव्हाण यांनी साकारली आहे. मचनसोपचार तज्ञ डॉ.प्रताप देशपांडेची भूमिका सुनिल गुरव यांनी साकारली आहे. मनाशी संघर्ष सुरु असतांना दिसणार्‍या डॉक्टरांच्या वडिलांची भूमिका वृध्द कलावंत लक्ष्‍मीनारायण आकेन यांनी केली आहे.
(मल्लिकार्जून धारुरकर)
 
Top