बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) : मागील पस्तीस वर्षांपासून प्रलंबित असलेल्या बार्शीतील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयास अंशत: मंजूरी मिळाली व अंतीम मंजूरीची प्रक्रिया येत्या काही दिवसांत पूर्ण होईल, अशी माहिती बार कौन्सील महाराष्ट्र व गोवाचे अध्यक्ष आशिष देशमुख यांनी दिली.
    पालकमंत्री ना.दिलीप सोपल हे बार्शी बार असोसिएशनचे अध्यक्ष असतांना मागील तीस ते पस्तीस वर्षांपूर्वीच याची मागणी केली होती. जागेची व इमारतीसाठीही विशेष निधीची उपलब्धता करुन बांधकाम पूर्ण करुन प्रक्रियेतील अडचणी दूर करण्यात आल्या आहेत.
    उच्च न्यायालयाचे रजिस्ट्रार यांच्या अध्यक्षतेखाली शिष्टमंडळासमवेत झालेल्या बैठकीत ही मंजूरी मिळाली आहे. पंढरपूर व माळशिरसच्या धर्तीवर बार्शी अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय होण्यासाठी जानेवारीमध्ये होणार्‍या कोर्ट इस्टॅब्लीश कमिटीच्या बैठकीत इतर बाबींचा विचार करुन उर्वरित पूर्तता करण्यात येईल. सदरच्या बार्शीतील न्यायालयाच्या कामकाजामुळे तीन तालुक्यांतील नागरिकांच्या व वकिलांच्या वेळेची बचत होणार आहे. सदरच्या अंशत: मंजूरीनंतर बार्शीतील वकिलांमध्‍ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
 
Top