उमरगा (लक्ष्‍मण पवार) : येथील पंचायत समिती सभागृहात तालुकास्‍तरीय स्‍वच्‍छता वक्‍तृत्‍वस्‍पर्धा गुरुवार दि. 28 रोजी उत्‍साही वातावरणात पार पडली.
    आयोजित कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी गटविकास अधिकारी बी.बी. खंडागळे हे होते. स्‍पर्धेचे उदघाटन सभापती सौ. अक्षरबाई सोनवणे यांच्‍या हस्‍ते झाले. तर प्रमुख पाहुणे म्‍हणून आदर्श महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दिलीप गरुड, गटशिक्षणाधिकारी सौ. सुधा साळुंखे, अधिक्षक ए.बी. शिंगडे, डी.आर. किरनाळे, जिल्‍हा समाज शास्‍त्रज्ञ रमाकांत गायकवाड, पी.एफ. चव्‍हाण यांची उपस्थिती होती.
    उमरगा तालुक्‍यातून पंचवीस विद्यार्थ्‍यांनी या स्‍पर्धेत सहभाग नोंदविला होता. या स्‍पर्धेत परीक्षक म्‍हणून श्रीमती सरिता कापसे, प्रविण स्‍वामी, विक्रम पांचगे, रघुवीर आरणे, ए.बी. शिंगडे आदींनी काम पाहिले. वरिष्‍ठ गटातून आदर्श महाविद्यालयातील विद्यार्थिनी कु. सुप्रिया भोसले हिने प्रथम क्रमांक पटकाविले. पृथ्‍वीराज जैनू राठोड याने द्वितीय तर तानाजी शिवाजी राठोड याने तृतीय क्रमांक पटकाविले. कनिष्‍ठ गटातून शिवाजी महाविद्यालय बलसूरची कु. स्‍वाती कुंभार प्रथम, कला, वाणिज्‍य व विज्ञान कनिष्‍ठ महाविद्यालय मुरुमचा राहुल विजय देडे द्वितीय, तर ज्ञानेश्‍वर उच्‍च माध्‍यमिक विद्यालय तुरोरीचा नाजमीन शब्‍बीर मुरमे याने तृतीय क्रमांक पटकाविला.
    दोन्‍ही गटातून अनुक्रमे रोख पाच, तीन व दोन हजार रुपये व प्रमाणपत्र असे पारितोषिक आहे. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार शांताराम गायकवाड यांनी मानले. कार्यक्रम यशस्‍वीतेसाठी श्रीहरी चव्‍हाण, विनोद जाधव यांनी परीश्रम घेतले.
 
Top