सोलापूर :- पत्रकारांनी माध्यमात लिखाण करित असतांना सामाजिक जबाबदारीचे भान ठेवावे असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार जे. टी. कुलकर्णी यांनी केले.
    राष्ट्रीय पत्रकार दिनानिमित्त श्रमिक पत्रकार संघात आयोजित कार्यक्रमात त्यांनी जनहित सेवेमध्ये प्रसारमाध्यमांची भूमिका या विषयावर मार्गदर्शन केले. यावेळी संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे, जिल्हा माहिती कार्यालयाच्या प्रतिनिधी श्रीमती रुपाली गोरे उपस्थित होते.
    आपल्या मार्गदर्शनात श्री. कुलकर्णी पुढे म्हणाले की, पत्रकार समाजात चांगले आणि वाईट या दोन्ही विषयावर लिखाण करित असतात. हे लिखाण करतांना त्यांनी समाजातील वास्तव लोकांपुढे मांडणे गरजेचे आहे. पत्रकारांनी लिखाण करतांना केवळ प्रसिध्दीसाठी म्हणून एखाद्यावर मर्यादा सोडुन टिका किंवा त्याचे गुणगान करु नये. वस्तुस्थितीचे लिखाण करित सामाजिक जबाबदारीचे भान ठेवणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले.
    समाजामध्ये जनहितार्थ सेवा करतांना पत्रकार जी कामे करतात त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप पडणे जरुरी आहे. भूतकाळात आणि वर्तमानात पत्रकारांनी समाजाला लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून मोलाचे योगदान दिले आहे. भविष्यातही देतील यात शंका नाही. सोलापूरातील पत्रकारांनी पत्रकारितेची खरी गरिमा सांभाळीत अत्यंत जबाबदारीने आणि जाणिवपूर्वक काम केल्याचे गौरवोदगार त्यांनी काढले. याच बरोबर पत्रकारांवरती होणारे हल्ले, महिला पत्रकारांवर होणारे अत्याचार थांबविण्यासाठी ठोस पावले उचलणे गरजेचे असल्याचेही शेवटी त्यांनी सांगितले.
    यावेळी श्रीमती गोरे म्हणाल्या की, राष्ट्रीय व राज्य पातळीवर शासनाची प्रतिनिधी म्हणून काम करतांना चांगल्या गोष्टी लोकांसमोर आणाव्या लागतात. सर्वसामान्य जनतेसाठी असलेल्या विविध योजना माध्यमांच्याद्वारे त्यांच्यापर्यंत पोहोचविणे हे महत्वाचे काम आहे. राज्याच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या लोकराज्य, जय महाराष्ट्र, दिल खुलास, महान्यूज या चारही माध्यमांमधुन संपूर्ण राज्यभर जनहित सेवेचे काम प्राधान्याने केले जाते. हे करित असतांना पत्रकारांनीही त्यांना सहकार्य करावे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
    कार्यक्रमाच्या सुरुवातीस दर्पणकार कै. बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन आणि दिप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक दै. पुण्यनगरीचे पत्रकार दत्ता मोकाशी यांनी तर आभार दै. सामनाचे प्रतिनिधी विजयकुमार राजापुरे यांनी व्यक्त केले. कार्यक्रमास अनेक पत्रकार बांधव उपस्थित होते.
 
Top