बार्शी : मुंबई येथील शिवतीर्थावर दि. १७ नोव्‍हेंबर रोजी शिवसेना प्रमुखांना मानवंदना देण्यासाठी दि. १६ नोव्‍हेंबर रोजी बार्शी तालुक्यातील शिवसैनिक मोठ्या संख्येने जाणार आहेत. त्यांच्या नियोजनासाठी जिल्हाप्रमुख लक्ष्‍मीकांत ठोंगे-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली बार्शीतील शासकिय विश्रामगृहात बैठक घेण्यात आली.
    यावेळी जिल्हा उपप्रमुख तात्या भँवर, जिल्‍हा महिला आघाडी प्रमुख अस्मिताताई गायकवाड, उपजिल्‍हा महिला संघटक टेकाळे ताई, भाऊसाहेब आंधळकर, राजेंद्र मिरगणे, तालुका प्रमुख काकासाहेब गायकवाड, तालुका महिला विभाग प्रमुख मंगलताई पाटील, दिपक आंधळकर व तालुक्यातील प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येनी उपस्थित होते.
    यावेळी बोलतांना ठोंगे पाटील म्हणाले, मागच्या वर्षी हिंदूहृदयसङ्क्राट मा. बाळासाहेब ठाकरे यांच्या जाण्याने संपूर्ण देशातील शिवसैनिकांवर दु:खाचा प्रसंग ओढवला. आजपर्यंत जगातील झालेल्या सर्वात मोठी अंत्ययात्रा ही शिवसेनाप्रमुखांची होती, त्यांच्या पुण्यस्‍मरण दिनादिवशी मानवंदना देण्यास शिवसैनिक मोठ्या प्रमाणात मुंबईला जाणार आहेत. बार्शीतील शिवसैनिक हे कट्टर मावळे आहेत. रेल्वेने असो, बसने वा अन्य वाहनाने शिवसैनिकांनी यावेळी अत्यंत शिस्तीने येण्याचे आहे. प्रत्येक शिवसैनिक संपूर्ण प्रवासात व्यसनापासून दूर असेल. कोणताही अनुचित प्रकार घडू नये याकरिता प्रत्येकाने काम करावे. हातामध्ये झेंडा, भगवी टोपी, गमजा असा पेहराव शिवसैनिकांचा असेल. शिवतीर्थावर शिवसेनाप्रमुंखांना मानवंदना देण्यासाठी आलेल्या लाखो शिवसैनिकांचे चित्रण करण्यासाठी देश व परदेशातील मिडीया येऊन दखल घेणार आहेत. शिवसेनाप्रमुखांच्या छायाचित्राचे डिजीटल आपापल्या भागात लावतांना अन्य कोणाचेही छायाचित्र यामध्ये घेऊ नये ही आचारसंहिता आहे. आपापल्या विभाग प्रमुंखांशी चर्चा करुन आपल्या प्रवासाचे योग्य ते नियोजन करावे.
    यावेळी भाऊसाहेब आंधळकर, तात्यासाहेब भँवर, राजेंद्र मिरगणे, अस्मिताताई गायकवाड, बाबासाहेब कापसे यांनी विचार व्यक्त केले.
- (मल्लिकार्जून धारुरकर)
 
Top