शिवसेना पक्षावरील जनतेचा वाढता विश्वास पाहून या पक्षातून निवडणुकीसाठी इच्छुकांची संख्या वरचेवर वाढत असल्याचे चित्र दिसून येत आहे. उस्‍मानाबाद (धाराशिव) लोकसभा मतदार संघातून उमेदवारी मिळावी यासाठी चार उमेदवारांची नावे चर्चेत असून आपल्यालाच कसे तिकीट ङ्किळेल यासाठी चारही जणांची रस्सीखेच सुरु झाली आहे.
    या चार उमेदवारांमध्ये उमरगा येथून मागच्या वेळी निसटता पराभव झालेले रविंद्र गायकवाड, उमरगा येथील सुनिल पाटील, उस्‍मानाबाद येथील  बोरकर, बार्शीतून राजेंद्र मिरगणे यांचा समावेश आहे. उमेदवारांच्या निवडीमध्ये काही निकष लावले जाणार आहेत. त्यामध्ये चांगल्या प्रतिमेचा, लोकांच्या संपर्कातील, सामाजिक कार्यात अग्रेसर, विविध विषयांचे सखोल ज्ञान, पक्षाशी इमान राखणारा, कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन जाणारा, पक्ष संघटना वाढीसाठी यापूर्वी व सद्यस्थितीत काम करणारा, निवडणुकीच्या किमान खर्चासाठी आर्थिकदृष्ट्या सक्षम, पदाधिकार्‍यांनी व शिवसैनिकांनी पुरस्कृत केलेला अशा उमेदवारांना प्राधान्याने तिकीट देण्यात येणार असून ज्यांना तिकीट मिळणार नाही अशा इतरांनी तिकीट मिळालेल्या उमेदवाराच्या विजयासाठी मनापासून काम करणे गरजेचे आहे.
    निवडणूकीतून विजयी होण्यासाठी शिवसेना हा पक्ष अत्यंत चांगला असल्याची खात्री झाल्यानंतर इतरही पक्षातून शिवसेनेत येण्यासाठी अनेकांची धडपड सुरु झाली आहे. मागील वर्षानुवर्षे राखीव असलेल्या उस्‍मानाबाद (धाराशिव) मतदार संघाला मागच्या पंचवार्षिकला खुला केल्यानंतर राष्ट्रवादीचे खासदार डॉ. पद्मसिंह पाटील आणि शिवसेनेचे रविंद्र गायकवाड यांच्यातच तुल्यबळ लढत झाली. सर्व तालुक्यांतून रविंद्र गायकवाड यांना मताधिक्य मिळाले. परंतु केवळ बार्शी तालुक्याने डॉ. पाटील यांच्या पारड्यात मताधिक्य दिल्याने डॉ. पाटील यांचा विजय झाला. या निवडणुकीत बार्शीतील राष्ट्रवादीच्या दिलीप सोपल यांच्यासह कॉंग्रेसचे राजेंद्र राऊत यांनी डॉ.पाटील यांचा प्रचार केल्याने त्यांची मते वाढल्याचा निष्कर्ष अनेकांनी काढला. परंतु यावेळी डॉ.पाटील यांना कसलेही सहकार्य करणार नसल्याचे राऊत यांनी जाहीर केल्याने मतांची विभागणी होणार आणि शिवसेनेचा उमेदवार निवडून येणार अशी खात्री झाल्याने अनेकांनी या पक्षातून उमेदवारीचा हट्ट सुरु केला आहे. स्वत:चा हट्ट सुरु असतांनाच इतरांना तिकीट कसे मिळणार नाही याचा प्रयत्न करत आपण कसे श्रेष्ठ आहोत हे दाखवण्याचाही प्रयत्न सुरु झाला आहे. यामध्ये आपण शिवसेनेचे पूर्वीपासूनचे कार्यकर्ते होतो हे दाखवण्याचाही प्रयत्न काहींना करावा लागत आहे.
    स्वत:चे अस्तित्व दाखवणे आणि तिकीट मिळविणे या परिक्षेत पास होण्याची राजकिय धडपड, इर्षा, स्वार्थ, कुरघोड्या, संघर्ष, उचापती यामुळे शिवसेना पक्षातून धाराशिव मतदारसंघाचे दररोज नवनवीन समीकरणे तयार होत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. याउलट राष्ट्रवादीतून डॉ.पद्मसिंह पाटील यांच्याशिवाय अन्य कोणाचेही नाव समोर आले नाही. पक्षाच्यावतीने योग्य वेळी योग्य उमेदवाराचेच नाव निश्‍चित केले जाणार असून त्यांच्या प्रचारासाठी सर्व यंत्रणा उभी केली जाणर आहे.

मल्लिकार्जुन धारुरकर
बार्शी
 
Top