सोलापूर -: सांघिक खेळामूळे संघ विजेता होत असतो. सांघिक भावना तयार होण्यासाठी खेळाचे महत्व आहे, असे प्रतिपादन पोलीस आयुक्त प्रदिप रासकर यांनी केले.
    राज्य राखीव पोलीस बल, सोरेगांव, सोलापूर येथील क्रीडांगणावर पुणे विभागीय महसूल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा 2013 चे त्यांच्या हस्ते झाले. त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. प्रविण गेडाम, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी तुकाराम कासार, प्रभारी अप्पर आयुक्त  तुकाराम पवार आदिंची प्रमुख उपस्थिती होती.
    यावेळी बोलतांना रासकर म्हणाले की, क्रीडा स्पर्धेत नैपुण्याची कसोटी लागते. त्यामूळे या स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व खेळाडूंचे अभिनंदन केले. सर्व खेळाडूंनी क्रीडा स्पर्धेच्या नियमाचे पालन करावे. नैपुण्यामध्ये आगळा - वेगळा ठसा उमटवावा असे आवाहन केले.
    याप्रसंगी बोलतांना जिल्हाधिकारी डॉ. प्रविण गेडाम म्हणाले की, महसुल अधिकारी, कर्मचारी यांना सतत कामाचा व्याप असतो. कामासाठीची वेळेची निश्चित मर्यादा नसते. त्यामूळे या क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेच्या निमित्ताने 3 दिवस मनसोक्तपणे सहभागी व्हावे, चांगल्या खेळांचे दर्शन घडवावे असे आवाहन केले.
    प्रारंभी निवासी उपजिल्हाधिकारी विजयसिंह देशमुख यांनी प्रास्ताविकात क्रीडा स्पर्धेबाबतची माहिती दिली.
    यावेळी विविध जिल्ह्यातील अप्पर जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी, तहसिलदार, महसुल विभागाचे विविध कर्मचारी, शहरातील नागरिक उपस्थित होते.
 
Top