उस्मानाबाद : समुद्राच्या खोलीपेक्षा किनारेच संथगत करतात. कितीही उथळ असला तरी माणसात उत्कटता असतेच, गंमतीतूनच सांगितलेल्या गोष्टीतून गांभीर्य सर्वासमोर येते, असे प्रतिपादन फ. मुं. शिंदे यांनी केले.
    सासवड येथे होणार्‍या ८७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याने फ. मुं. शिंदे यांचा उस्मानाबादेत विविध संघटनांच्या वतीने रविवार दि. 18 नोव्‍हेंबर रोजी जाहीर सत्कार झाल्यानंतर ते बोलत होते. यावेळी बोलताना त्यांनी गमतीदार पद्धतीने समाजातील वास्तवाचे किस्से सांगितले.
    उस्‍मानाबाद येथील जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात रविवारी दुपारी झालेल्या सत्काराच्या कार्यक्रमात उस्मानाबादकर कवितांनी तर फ.मुं.उस्मानाबादकरांच्या प्रेमाने चिंब झाले. एवढय़ा संघटनांनी एकत्र येऊन पहिल्यांदाच असा मोठा सत्कार केल्याचे ते भाषणात म्हणाले. कार्यक्रमासाठी व्यासपीठावर मराठवाडा साहित्य परिषदेचे उपाध्यक्ष डॉ.दादा गोरे, कार्यवाह कुंडलिक अतकरे, मसाप उस्मानाबादचे अध्यक्ष नितीन तावडे, पत्रकार संघाचे अध्यक्ष अनंत आडसूळ जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस. एल हरिदास यांची प्रमुख उपस्थिती होती.
    फ.मुं.शिंदे यांनी सुमारे अर्धा तासाच्या भाषणात अनेक किस्से सांगितले. यात समाजातील दु:ख, वास्तव याबरोबरच राजकारण्यांना कानपिचक्याही होत्या. राजकारणी मंडळीबाबत बोलत असताना ते म्हणाले की, लोक कधी कधी काहीही विचारतात. सगळ्या पक्षांची घरे चांगली असतात. मात्र कावळ्याचे घर ओबडधोबड का असते. त्यावर त्यांनी सांगितले की एकदा दुसर्‍याची पिंड उचलण्याची सवय लागली की, आपल्या घराकडे लक्ष द्यायला त्यांना वेळ नसतो. शहरातील ५0 हून अधिक संस्थांनी सत्कार केल्याने उस्मानाबादकरांनी केलेला हा सत्कार प्रातिनिधिक महाराष्ट्राचा सत्कार असल्याचे मानतो असेही फ. मुं. म्हणाले.
    विनोदी किस्से सांगताना फ.मुं.शिंदे म्हणाले की, आपल्याकडे ग्रामीण भागात बायकोला खटलं असाही शब्दप्रयोग केला जातो. दिल्लीमध्ये एका महिलेने प्रश्न केला की पत्नीला खटलं अस का म्हणतात. त्यावर 'पटल म्हणून खटलं' असे उत्तर दिल्याचेही फ. मुं. यांनी सांगितले. तसेच महिलेचा पदर डोक्यावरुन खांद्यावर आला आता खांद्यावरुन कुठे? या प्रश्नाला त्यांनी पदर कुठेही असला तरी पुरुषाला पदराखाली घेणारी स्त्रीचं असल्याचे सांगून त्यांनी महिलेचे महत्व विषद केले.
    कागदावर लिहिणार्‍या लेखकापेक्षा काळजावर लिहिणारा श्रेष्ठ असतो. साहित्य व राजकारण या परस्परविरोधी गोष्टी आहेत. कविला कोणताही पक्ष नसतो. जनतेचा पक्ष तोच कवीचा पक्ष. सगळ्याच पक्षात मित्र आहेत. तरीही काहीजण विचारतात तुम्ही राष्ट्रीय की राष्ट्रवादी. त्यावर माझे एकच उत्तर असते.माझी पत्नी गुजराती असल्याने मी सौराष्ट्रवादी असेही फ. मुं.शिंदे यांनी भाषणात सांगितले. अशा किस्स्यामुळे यशवंतराव चव्हाण सभागृहात तुफान हास्य पिकले नसते तरचं नवल. जातीला न चिटकण्याचा विवेक बाबासाहेबांनी दिला,
'मी गोसावी दारोदारी, सुखे मागत फिरतो आहे.
दार एकही दिसले नाही, जिथे दु:ख भेटले नाही..'
या कवितेच्या ओळी सांगून जातीमुळे आतापर्यंत कुणाचेच भले झाले नसतानाही ही जात चिटकून आहे. माणूस जन्माला आला की लगेच त्याला जात चिटकते. मात्र त्या जातीला चिटकून रहायचे किंवा नाही हा विवेक डॉ. बाबासाहेब आंबेडकर, शाहू, फुले यांनी दिला.सत्कारप्रसंगी महिला मंडळांनी तुळजाभवानीचा फोटो दिला.तर काही युवकांनी शिवाजी महाराजांचाही फोटो दिल्याने आनंद झाला. कारण शिवाजी महाराजांनी कधीही कुणाची जात पाहिली नसल्याचेही फ. मुं.यांनी सांगितले.
    यावेळी अनंत आडसूळ, दादा गोरे व कुंडलिक आतकरे यांनीही विचार मांडले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक नितीन तावडे यांनी केले. रविंद्र केसकर यांनी सूत्रसंचलन केले तर तृप्ती अंधारे यांनी आभार मानले.
 
Top