बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) : राजकारण हा सर्वश्रेष्ठ खेळ आहे, या खेळात मातंग समाजाने उतरणे गरजेचे आहे. राजकारणाशिवाय कोणत्याही प्रश्‍नाला वाचा फुटत नाही, असे मत दलित महासंघाचे संस्थापक अध्यक्ष प्रा.डॉ. मच्छिंद्र सकटे यांनी व्यक्त केले.
    बुधवार दि. ६ नोव्‍हेंबर रोजी गर्दीने खचाखच भरलेल्या बार्शीतील यशवंतराव चव्हाण सभागृहात झालेल्या निर्धार मेळाव्यात अध्यक्षस्थानावरुन ते बोलत होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीस महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन व दिपप्रज्वलन करुन मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.
    यावेळी उद्घाटक स्नेअस फाऊंडेशनचे अध्यक्ष सुधीर गाढवे, शाहिर नंदा पाटोळे, शाहिर मनोज भडकवाड, माजी उपनगराध्यक्ष नवनाथ चांदणे, प.महा.अध्यक्ष राजाभाऊ खिलारे, नगरसेवक अमोल चव्हाण, माजी नगरसेवक अरविंद वाघमारे, प्रांतिक सदस्य दादाराव पाटोळे, माजी नगरसेवक किरण तौर, धाराशिव जिल्हाध्यक्ष बाळासाहेब तुपसुंदर, माजी शि.मं.सदस्य श्रीधर कांबळे, जि.उपा. रमेश कांबळे, नगरसेविका सिताबाई पवार आदि पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते.
    पुढे बोलतांना सकटे म्‍हणाले, झाडु परिषदेबाबत बोलायचे तर माझेही लहानपण झाडु बनविणे, दोरखंड बनविणे यामध्ये माझे लहानपण गेले आहे. महाराष्ट्रातील विविध ठिकाणच्या झाडुचा व्यवसाय करणारांच्या समस्येबाबत विचार करण्यात येणार आहे. २५ रुपये विक्री होणारी केरसुणी १३ रुपयांना व्यापार्‍यांकडून खरेदी केली जाते त्यामुळे झाडु उत्पादकांचे नुकसान होत आहे. त्याबाबत या झाडू परिषदेत विचार करण्यात येईल. ही शाहीर अमरशेखांची जन्‍मभूमी आहे. फार मोठा कलावंत मुस्‍लीम समाजात जन्‍म घेऊनही आण्णा भाऊंवर मनापासून फार मोठे प्रेम केले आहे. ही माणसे मातंग समाजावर प्रेम करणारी माणसे आहेत असे अण्णाभाऊंकडे बघून म्हणावे लागेल. शाहीर अमर शेखांसारखी व्यक्ती आमची मित्र होऊ शकली नसली तरी सुधीर गाढवेंसारखा मित्र आम्हाला मिळाला ही आमच्या दृष्टीने फार मोठी गोष्ट आहे. आम्ही मैत्रीला जागणारे, आण्णाभाऊंचे वारसदार आहोत. शाहीर अमरशेखांचे खरे नाव दोन वेगवेगळे महेबूब हुसेन शेख आणि महेबूब हुसेन पटेल असे वेगवगेगळ्या पध्दतीने येते. ज्यांनी आम्हा गरिबांना नाडलं हो त्याच्या तिजोरीला भोक आम्ही पाडलं हो, ही शाहिर अमर शेखांची लावणी ब्रिटीश सरकारला इतकं त्रासदायक ठरली की त्यांच्यावर वॉरंटच काढलं. त्यामुळेच त्यांना नाव बदलणे भाग पडले व त्यांना अमर शेख म्हणू लागले. साहित्यीक, नेता, अभिनेता, कवि, गीतकार, संगीतकार, नाटककार, पोवाडेकार, देशभक्त असे विविध रुपे आणि आण्णाभाऊंचे मित्र असलेले अङ्कर शेख यांचे बार्शीत स्‍मारक व्हावे यासाठी राहुल जगदाळे, हर्षवर्धन पाटील हे प्रयत्न करीत आहेत. त्यांच्या कोणत्याही आंदोलनास दलित महासंघ बरोबर असेल. अमर शेखांच्या नावाने मुंबई विद्यापीठात सन २००७ पासून एक अध्यापन कक्ष सुरु आहे. सोलापूर विद्यापीठाने देखिल अभ्यासन सुरु केले पाहिजे. समाजकारण, अर्थकारण, साहित्य क्षेत्रात, घरातही आपलं चांगलं नाही. समाजात, गावात कौतुक नाही कोणी विचारत नाही. दारिद्रयरेषेखाली नावासाठी दिशाभूल केली जाते, विचित्र पध्दतीने सर्व्‍हे आणि सर्वेक्षण केले जातात. अन्याय करतात असे म्हणण्यात अर्थ नाही तर निर्धार केला पाहिजे की अन्याय सहन करणार नाही. दाभोळकरांची हत्या झाली त्यांच्या खुनाचा तपास अद्यापही होत नाही. गुन्हेगार पोलिसांपेक्षा जास्त हुशार असल्याचे दिसते. डॉ.दाभोळकरांनी आपले आयुष्य खर्ची घातले आणि मंगळावर यान सोडण्यासाठी प्रङ्कुख असलेल्या शास्त्रज्ञांची अंधश्रध्दा तिरुपती बालाजीच्या दर्शनातून जगासमोर उघड झाली. शास्त्रज्ञच एखाद्या देवापुढे नतमस्तक होत असतील तर या देशाची अंधश्रध्दा हटणार कशी ? अशा शास्त्रज्ञांची अंधश्रध्दा सर्वप्रथम नष्ट केली पाहिजे. आम्ही आमचा समाज विज्ञानवादी होण्यासाठी प्रयत्न करत आहोत. आपल्याला जाणीवपूर्वक काम करावे लागेल. येणारी पिढी जर बदलायची असेल तर या पिढीला काम करावे लागेल. डॉ.आंबेडकरांनी शिका म्हणून सांगीतले. नोकर्‍या मिळाल्या नाही तरी चालेल पण आपले मुले शिकले पाहिजे, हे समाजात रुजले पाहिजे. महिला सक्षमीकरणाबाबत शासनाचे प्रचंड दुर्लक्ष आहे. कोणतेही भरीव काम झाले नाही. १६ हजार महिलांवर अत्याचार झाले त्यापैकी ८ हजार महिलांवर सासरच्या व्यक्तींकडून अन्याय अत्याचाराची बळी झाली. ग्रामपंचायतीत निवडून येणारे आणि सरपंच झालेले स्वत:ला एक नळ कनेक्शनही घेऊ शकत नाहीत. एक खासदारकी मिळविण्यासाठी काय काय केले जाते, सर्व व्यवस्थेंच्या विरोधात बोलणारे आठवले हे राजकारणातील ससेहोलपटीवर का बोलत नाहीत. मताच्या पेट्या पूजन करण्यासाठी मातंग समाजाची लोकं बोलावली जातात आणि सत्ता आल्यावर ते कुठे आहेत याचे भानही राहत नाहीत. सगळ्या प्रश्‍नाची उत्तरे राजकारणात आहेत आणि आपला माणूस राजकारणात नाही. आपल्याविषयी बोलणारा कुणीतरी असला पाहिजे, राजकारण हा जबरदस्त खेळ आहे आणि या खेळात आपला समाज नाही, या खेळातच आपण नाही एक डाव खेळून बघू या, राजकारण जर सर्वश्रेष्ठ खेळ असेल तर या खेळात समाजाने उतरले पाहिजे. नुसते जय म्हणाचे का, हरले तरी चालेल, मरलो तरी चालेल परंतु हा महत्वाचा खेळ जो खेळेल त्याच्या सोबत राहिले पाहिजे आणि ओळखायला पाहिजे कोण कोणासाठी खेळतोय. जे जे मातंग समाजाचे नेते झाले ते प्रस्तापितांचे भाटगिरी करत आहेत. या पुढे कोणाची भाटगिरी करायची नाही, असेही ते शेवटी म्‍हणाले.
    मेळाव्याचे उद्घाटक सुधीर गाढवे यांनी बोलतांना म्‍हणाले, दलित समाजाची आजतागायत झालेली स्थित्यंतरे, होणारा अन्याय, समाजसुधारक, प्रत्येकाला मताचा अधिकार आहे, यापुढील लोकशाही समाजाभिमुख झाली पाहिजे, खरी लोकशाही आपल्याकडे अजूनही आली नाही, राजकिय समाजवाद झाला असला तरी जे पूर्वीपासून प्रस्थापित होते तेच पुढे जातात, खालच्या लोकांना ती पायरी गाठण्यासाठी आयुष्य घालावे लागते तरीही ती पायरी गाठता येत नाही. स्वत:ची परिस्थिती सुधारण्यासाठी आर्थिक सक्षमता गरजेची त्याकरिता समाज एकसंघ होणे गरजेचे आहे. सर्व जातीच्या लोकांनी एक यावे, मोठ्या शहरात सर्व जातीधर्मांचे लोक एकत्र येतात तशी परिस्थिती आपल्याकडे येण्यासाठी प्रयत्न केले पहिजे.
    प्रास्ताविक मेळाव्याचे स्वागताध्यक्ष सुनिल अवघडे यांनी केले, कार्यक्रमाचे सूत्रसंचलन ढवणे यांनी केले तर आभार उमेश ढावारे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी निलेश खुडे, सुनिल झोंबाडे, ज्ञानेश्वर शिंदे, संगीत शिंदे, सुरेश शेंडगे, संतोष बगाडे, महादेव भिसे, सुग्रीव चव्हाण, लखन कांबळे, पिंटू सरवदे, पोपट चंदनशिवे, दत्ता जाधव, लहू मस्के, प्रङ्कोद झोंबाडे, गब्बर पारगी, कैलास आडसूळ, विलास कांबळे यांसह शहर व तालुक्यातील पदाधिकारी यांनी प्रयत्न केले.
 
Top