परंडा - सरपण घेवून घराकडे परतणार्‍या महिलेस वाटेत अडवून तिच्यावर चौघांनी सामूहिक बलात्कार केल्‍याची घटना मलकापूर (ता. परंडा) शिवारात बुधवारी दुपारी घडली. याप्रकरणी चौघा आरोपींना पोलिसांनी अटक केली असून यातील दोघा आरोपींना गुरुवार रोजी न्‍यायालयासमोर उभे केले असता दोघांना पाच दिवसाच्‍या पोलीस कोठडीत ठेवण्‍याचे आदेश न्‍यायालयाने दिले आहे.
    परंडा तालुक्‍यातील मलकापूर येथील २२ वर्षीय विवाहित महिला बुधवार दि. ६ नोव्हेंबर रोजी सकाळी सरपण आणण्यासाठी शिवारातील स्वत:च्या शेताकडे गेली होती. त्याच दिवशी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास ती सरपण घेऊन घराकडे परत येत होती. त्यावेळी त्याच शिवारातील युवराज खोसे यांच्या शेताजवळ चौघांनी मिळून सदर महिलेस अडविले. निर्जन ठिकाणाचा फायदा घेत बांधावर चौघांनी मिळून बलात्कार केल्याची फिर्याद पिडीत महिलेने दिली आहे. त्यावरुन मलकापूर येथील अशोक प्रल्हाद शिंदे (वय २४), जीवन विनायक वाघमारे (२३) व अन्य दोन अल्पवयीन आरोपीविरुद्ध अंबी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून अधिक तपास उपविभागीय पोलिस अधिकारी पी.पी.टिपरे या करीत आहेत. गुन्हा दाखल होताच अंबी पोलिसांनी यातील चारही आरोपींना बुधवारी रात्री अटक केली. यातील अशोक शिंदे व जीवन वाघमारे यांना गुरुवारी परंडा न्यायालयासमोर उभे केले होते. न्यायालयाने सदर दोघांना पाच दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. यातील दोघा अल्पवयीन आरोपींना उस्मानाबाद येथील बालन्यायालयासमोर उभे करण्यासाठी पाठविण्यात आल्याचे अंबी ठाण्याचे सपोनि राऊत यांनी सांगितले.
 
Top