उस्मानाबाद : मराठवाडा साहित्‍य परिषद उस्‍मानाबाद व जिल्‍हा पत्रकार संघ यांच्‍यावतीने रविवार दि. 17 नोव्‍हेंबर रोजी ८७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल ज्येष्ठ साहित्यिक प्रा.फ.मुं.शिंदे यांचा रविवारी उस्मानाबादेत सत्कार करण्यात येणार आहे.
    जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात दि. १७ नोव्हेंबर रोजी सकाळी १०.३० वा. होणा-या या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून मसापचे उपाध्यक्ष डॉ.दादा गोरे, कार्यवाह कुंडलिक अतकरे, उस्मानाबाद मसापचे अध्यक्ष नितीन तावडे, जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष अनंत आडसुळ आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमास जिल्ह्यातील साहित्यप्रेमींनी उपस्थित रहावे असे आवाहन मसाप उस्मानाबाद शाखेचे अध्यक्ष नितीन तावडे व जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष अनंत आडसुळ यांनी केले आहे.
    मराठवाडा साहित्य परिषद, जिल्हा पत्रकार संघाबरोबरच शहरातील सिद्धीविनायक परिवार, अंधश्रद्धा निर्मूलन समिती, जिल्हा मुख्याध्यापक संघ, पतंजली योग समिती, रोटरी क्लब, लघु उद्योग भारती, बील गेटस कॉलेज, जैन सोशल ग्रुप, अक्षरवेल महिला साहित्य मंडळ, भाई उद्धवराव पाटील स्मारक समिती, राष्ट्रवादी काँग्रेस ज्येष्ठ नागरीक संघ, सुशिलादेवी नागरी सहकारी पतसंस्था, अ.भा.सानेगुरुजी कथामाला, मध्यवर्ती जिजाऊ जन्मोत्सव समिती, फोरम ऑफ उस्मानाबाद सिटीझन्स(फुक) आणि व्यापारी महासंघ आदी संस्था ही या सत्कार सोहळ्यात सहभागी होणार आहेत.
 
Top