उस्मानाबाद :- शेतकरी प्रतिनिधी व कारखानदार यांनी सामंजस्याची भूमिका घेऊन उस दर निश्चितीप्रकरणी शांततेच्या व चर्चेच्या मार्गानेच तोडगा काढावा. जिल्ह्यातील शांतता व सुव्यवस्था कोणत्याही प्रकारे बाधित होणार नाही आणि सर्वसामान्य नागरिकांना त्याची झळ पोहोचणार नाही, याची काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी जे.टी. पाटील यांनी केले.
    येथील जिल्हाधिकारी कार्यालयात शुक्रवार दि. 29 नोव्‍हेंबर रोजी शेतकरी संघटनांचे प्रतिनिधी व जिल्ह्यातील कारखान्यांचे प्रतिनिधी यांची बैठक झाली. त्यावेळी श्री. पाटील यांनी हे आवाहन केले. नांदेड येथील साखर सहसंचालक श्रीकांत देशमुख, अपर पोलीस अधीक्षक बाळकृष्ण भांगे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय गायकवाड, जिल्हा उपनिबंधक एस.पी. बडे यांच्यासह शेतकरी संघटना प्रतिनिधी व साखर कारखाना प्रतिनिधी यांची यावेळी उपस्थिती होती.
     यावेळी शेतकरी संघटना प्रतिनिधींचे म्हणणे श्री. पाटील व श्री. देशमुख यांनी ऐकून घेतले. यावेळी साखर कारखान्यांनी दर जाहीर करावा, अशी मागणी संघटना प्रतिनिधींनी केली. यासंदर्भात कारखाना प्रतिनिधींनी अध्यक्ष व संचालक मंडळांशी चर्चा करुन आजच्या बैठकीतील शेतकरी संघटनांची मागणी त्यांच्यापर्यंत पोहोचवावी. दोघांनीही एकमेकांशी समन्वयाने दराबाबत सकारात्मक चर्चा करावी, असे आवाहन श्री. पाटील यांनी केले. श्री. देशमुख यांनीही शनिवारपर्यंत कारखाना प्रतिनिधींनी त्यांच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा झाल्याची बाब साखर सहसंचालकांना कळवावी, असे सांगितले. या प्रश्नी सामोपचारानेच मार्ग निघू शकतो. उसदरासंदर्भात केंद्रीय स्तरावरही समिती स्थापन करण्यात आली आहे. त्यामुळे शेतकरी प्रतिनिधींनीही याबाबत शांततेने तोडगा काढण्याबाबत आग्रही राहावे, अशी भूमिका त्यांनी मांडली.
    जिल्ह्यातील शांतता व सुव्यवस्था यास कुठेही बाधा येणार नाही, अशा पद्धतीने हा प्रश्न सोडविण्यावर भर द्यावा, असे आवाहन यावेळी जिल्हाधिकारी पाटील यांनी केले.  
 
Top