उस्मानाबाद :- राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती विभाग, स्वर्णजयंती ग्रामस्वरोजगार योजनांतर्गत विभागीय आयुक्त कार्यालय, औरंगाबाद आणि येथील जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या वतीने आयोजित केलेल्या स्वयंसहायता समुह व बचत गट निर्मित वस्तूंचे प्रदर्शन व विक्री उपक्रमास उस्मानाबादकरांनी चांगला प्रतिसाद दिला. जवळपास अडीचशे बचत गटांचा सहभाग असणा-या या प्रदर्शनात सात दिवसात तब्बल ३० लाख रुपयांच्या वस्तुंची विक्री झाली.
        जिल्हा   क्रीडा संकुल येथे २५ नोव्हेंबर ते १ डिसेंबर या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या या प्रदर्शनाचा समारोप आज झाला. राज्य परिवहन महामंडळाचे अध्यक्ष जीवनराव गोरे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष डॅा. सुभाष व्हट्टे, उपाध्यक्ष संजय पाटील दुधगावकर, जिल्हाधिकारी जे.टी. पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक सचिन पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी एस.एल. हरिदास,  जि.प. महिला व बालकल्याण सभापती सविता कोरे, उपायुक्त श्री. बेदमुथा, शीला उंबरे, बचत गट प्रतिनिधी सीताबाई मोहिते, उपमुख्य कार्यकारी अधिकारी के.डी. बोणे व दादासाहेब वानखेडे, प्रकल्प संचालक डॅा. केशव सांगळे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी शीतलकुमार मुकणे आदींची यावेळी उपस्थिती होती.
      यावेळी बचत गट प्रदर्शनात सर्वाधिक विक्री झालेल्या महिला बचत गट प्रतिनिधींचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यात भीमाई बचत गट, बुलढाणा (विक्री- 1 लाख 82हजार, 220 रुपये), अहिल्यादेवी म. ब.गट, ताडनायगाव, जालना (विक्री-92हजार150), ओम महिला बचत गट, रायगड (70 हजार, 300), समता महिला बचत गट, पाचोड, जळगाव (61 हजार, 700), लक्ष्मीआई महिला बचत गट, नाऊचाकूर, उस्मानाबाद (53 हजार800), माऊली बचत गट, केमवाडी, उस्मानाबाद (41 हजार 700), श्रीसाई महिला बचत गट, सोयगाव, औरंगाबाद (44 हजार, 900), हरिओम महिला बचत गट, निफाड, नाशिक (37 हजार 900), सद्गुरु महिला बचत गट, ईटकूर, उस्मानाबाद (36 हजार 800) आणि भाग्यलक्ष्मी महिला बचत गट, बावी , उस्मानाबाद (विक्री-36 हजार 100 रुपये) या प्रथम 10 बचत गटांचा सत्कार करण्यात आला. 
     समारोपावेळीही विविध मान्यवरांनी या प्रदर्शनात सहभागी झालेल्या बचत गटांचे विशेष कौतुक केले.
     गोरे म्हणाले की,  महिलांविषयीची मानसिकता बदलण्यासाठी राज्य व केंद्र शासन विशेष प्रयत्न करीत आहे. बचत गटांच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणाची चळवळ चांगल्या पद्धतीने रुजली आहे. आता, समाजात संस्कार रुजविण्याचे काम या माध्यमातून होणे गरजेचे आहे. समाजात महिलांची संख्या ५० टक्के आहे. ही शक्ती कार्यक्षम करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले. शासन योजनांची माहिती बचत गटांच्या माध्यमातून घराघरांपर्यंत पोहोचली पाहिजे. एस.टी. महामंडळानेही आता महिला चालकांची नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला आहे. कोणत्याही क्षेत्रात महिला मागे नाहीत, त्यामुळेच हा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले. मानव निर्देशांक कमी असलेल्या हिंगोली सारख्या जिल्ह्यात मुलींना शिक्षणासाठी मोफत प्रवासाची सवलत दिली जात असल्याची माहिती त्यांनी दिली.
      डॅा. व्हट्टे यांनी महिलांमधील क्षमतेला वाव देण्याचा आणि त्यांचा आत्मविश्वास वाढविण्याचा हा प्रयत्न स्तुत्य असल्याचे सांगितले  तर श्री दुधगावकर यांनी जिल्ह्यातील महिला बचत गटांना व्यासपीठ मिळावे. जिल्ह्याबाहेरुन आलेल्या बचत गटांनी मार्केंटींगची पद्धत, वस्तुनिर्मिती आदींची त्यांना ओळख व्हावी, या उद्देशाने हा उपक्रम उस्मानाबाद येथे घेण्यात आल्याचे सांगितले. बचत गटातील महिलांचा आत्मविश्वास वाढण्यास यामुळे मदत होणार असल्याचे ते म्हणाले.
      महिला व बालकल्याण सभापती कोरे यांनी महिलांना सक्षम करण्यासाठी अधिकाधिक व्यासपीठ उपलब्ध करुन देण्याची गरज व्यक्त केली.
       जिल्हाधिकारी पाटील यांनी अशा उपक्रमाच्या माध्यमातून महिलांच्या कलागुणांना आणि उद्यमशीलतेला वाव मिळत असल्याचे सांगितले. समान पद्धतीच्या वस्तुंचे उत्पादन घेणा-या बचत गटांना एकत्र करुन त्यांच्या उत्पादनांना बाजारपेठ मिळावी, यासाठी जिल्हास्तरावर नियोजन करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
     प्रास्ताविकात हरिदास यांनी सात दिवसातील बचत गट प्रदर्शनाबाबत आणि त्याला मिळालेल्या प्रतिसादाबद्दल मनोगत व्यक्त केले. एवढ्या मोठ्या प्रमाणात आयोजन करताना काही उणीवा राहू शकतात, मात्र, बाहेरील जिल्ह्यातून आलेल्या बचत गट महिला प्रतिनिधींची सोय आणि सुरक्षितता लक्षात घेऊन नियोजन करण्यात आले. त्यासाठी जिल्हा प्रशासनाचे विविध विभागांचेही चांगले सहकार्य मिळाले. प्रसारमाध्यमांच्या सहकार्यामुळे अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहोचता आले. आगामी काळात अधिक चांगल्या पद्धतीने आयोजन करण्याबाबत त्यांनी सूचित केले.
      कार्यक्रमाचे सूत्रसंचलन रमाकांत गायकवाड यांनी केले तर डॅा. सांगळे यांनी आभार मानले. सात दिवशीय हे प्रदर्शन यशस्वी करण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासन तसेच जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या सर्व अधिकारी-कर्मचा-यांनी सहकार्य घेतले.
 
Top