उस्मानाबाद : हिंदवी स्वराज्याची स्थापना करण्यास लावणा-या जिजाऊचे स्मरण करावे, त्यांच्या कार्याचा लौकीक लोकांपर्यंत पोहंचवावा म्हणुन दरवर्षी १२ जानेवारी रोजी मध्यवर्ती जयंती उत्सव समितीच्यावतीने जिजाऊ जयंतीचे आयोजन करण्यात येते. या दिवशी जिजाऊ पुरस्कार देवून कर्तबगार महिलांचा सन्मान करण्यात येणार आहे.   
      सन २००७ पासुन मध्यवर्ती जिजाऊ जयंती उत्सव समिती व जिजाऊ पुरस्कार निवड समितीच्या सहकार्याने कार्यक्रम राबविले जातात. उत्सव समिती संपुर्ण कार्यक्रमाचे नियोजन करणे व पुरस्कार निवड समिती ‘जिजाऊ पुरस्कार’, राजर्षी शाहू महाराज समाजभुषण पुरस्कार, स्वराज्य संकल्पक शहाजीराजे क्रिडा पुरस्काराची निवड करते. पुरस्काराचे स्वरुप सन्मानपत्र, सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ असे आहे. आदर्श व कर्तृत्ववान महिलांना जिजाऊ पुरस्कार देण्यात येतो. आतापर्यंत हा पुरस्कार जिजाबाई देशमुख, प्राचार्य सौ. विमल मोरे, सौ. वैशालीताई मोटे, सौ. लक्ष्मीबाई हाजगुडे यांना देण्यात आलेला आहे. सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजावणा-या सामाजिक संस्थेला राजर्षी शाहू महाराज समाजभुषण पुरस्कार देण्यात येतो हा पुरस्कार गतवर्षी लोकमंगल सामाजिक संस्थेला देण्यात आला आहे. क्रिडा क्षेत्रातील विशेष योगदानासाठीचा स्वराज्य संकल्पक शहाजीराजे क्रिडा भुषण पुरस्कार देण्यात येतो तो गतवर्षी राज्य खो-खो संघटनेचे सरचिटणीस प्रा. डॉ. चंद्रजीत जाधव यांना देण्यात आला होता. उत्सव समितीच्यावतीने क्रिडा क्षेत्रातील राज्य पातळीवरील व राष्ट्रीय पातळीवरील विजेत्या मुलीच्या संघाचाही सन्मान करण्यात येतो. राष्ट्रीय पातळीवर सुवर्णपदक प्राप्त चालू वर्षातील मुलीनाही सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात येते. यावर्षापासुन उत्सव समितीच्यावतीने कला, क्रिडा, राजकारण, समाजकारण, शिक्षण, आरोग्य, आदर्श कुटूंब, उद्योग, व्यापार, शेती या विभागात विशेष कार्य करणा-या महिलांचा विशेष सन्मानचिन्ह देऊन त्यांना गौरविण्यात येणार आहे. १२ जानेवारी २०१४ रोजी विशेष समारंभात वरील सर्वांचा गौरवपुर्वक सत्कार समारंभ पार पडणार आहे. जिजाऊ जन्मोत्सव समिती व पुरस्कार निवड समितीच्या वतीने कर्तृत्वान महिला भगिनींनी समितीशी संपर्क करावा व आपणास गौरविण्यास आम्हास संधी द्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.
 
Top