बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) : विद्यार्थ्यांना केवळ शिक्षण नव्हे तर जीवन शिक्षण मिळावे याकरिता कर्मवीर डॉ. मामासाहेबांनी प्रयत्न केले, मुलांकडून वेगवेगळी कामे करुन घेत श्रमदान, स्त्रीशिक्षण, समभाव, आत्‍मीयतेचे धडे मामांनी विद्यार्थ्यांना दिले असे मत राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. दिलीप सोपल यांनी व्यक्त केले.
    यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ, नाशिक यांच्‍यावतीने सवोत्कृष्‍ट संस्थेस देण्यात येणार्‍या पंजावराव देशमुख स्‍मृती गौरव पुरस्कार बार्शीतील शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळास देण्यात आला. यावेळी ना. सोपल हे बोलत होते. हे विद्यापीठाचे रौप्य महोत्सवी वर्ष देखिल आहे. सन्‍मानपत्र, पंचवीस हजार रुपये, स्‍मृतीचिन्ह शाल, श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. संस्थेच्या वैष्णवी बारंगुळे व संध्या संकपाळ या १४ वर्षांखालील दोन विद्यार्थीनींची निवड राज्य संघात झाल्याने त्यांचाही गौरव यावेळी करण्यात आला.
    हा पुरस्कार वितरण सोहळा शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाच्या प्रांगणात शनिवार दि. २८ डिसेंबर रोजी सायंकाळी समारंभपूर्वक पार पडला. संस्थेचे माजी विद्यार्थी, राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री, ना.दिलीप सोपल यांच्या हस्ते संस्थेच्यावतीने डॉ.बी.वाय. यादव यांनी स्विकारला. यावेळी व्यासपीठावर यशवंतराव चव्‍हाण मुक्‍त विद्यापीठाचे कुलसचिव प्रकाश निंबाळे, ज्येष्ठ साहित्यीक अनंत दिक्षीत, डॉ.शाम पाडेकर, एन.के.शिंदे, शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे पदाधिकारी आदी उपस्थित होते.
    ना. सोपल बोलताना पुढे म्हणाले, शिवाजी महाराजांना त्यांच्या मावळ्यांनी जीवाची पर्वा न करता साथ दिली, त्याच पध्दतीने संस्था वाढीसाठी त्याकाळातील व्यक्तींनी मदत केली व त्यामुळे वैभवशाली विस्तार होत गेला. आज ही मालिका डॉ.बी.वाय.यादव यांच्यापर्यंत सुरु आहे. सर्वांनी निस्वार्थीपणे काम केले व अशीच माणसे मिळत गेली त्यामुळेच मामांनी पाहिलेले स्वप्न पूर्ण होत आहे, ते यशस्वी होण्यासाठी विश्‍वस्त अहोरात्र काम करीत आहेत. कर्मयोग्याचे स्वप्न साकार करण्यास अनेकांचा खारीचा वाटा आहे. एवढी आभाळाएवढी माणसे आपल्या डोळ्यादेखत होऊन गेली त्यांच्या सहवासातील व्यक्तींना अथवा त्यांच्या चरित्र वाचनानंतर आपणास कळेल. महात्‍मा गांधीजी नंतर साध्या राहणीत मोठ्या विचाराचे व्यक्ती म्हणून कर्मवीर डॉ.मामासाहेबांचे नाव घ्यावे लागेल. शिल्लक संपत्ती काय आहे तर त्यांचा लोककल्याणाचा विचार, बोर्डिंगमधील यशस्वी झालेले हजारो कर्तबगार विद्यार्थी हाच मामांचा खरा बँक बॅलन्स आहे. आजच्या बदलत्या परिस्थितीमुळे नाईलाजाने असे म्हणावे लागते पूर्वीचा सानेगुरुजींचा काळ होता आणि आता नाणे गुरुजींचा काळ आला आहे, असेही सोपल यांनी म्हटले.
    नाशिक येथे हा पुरस्कार एकट्याने स्विकारण्यापेक्षा या पुरस्कारावर ज्या सर्वांचा खरा अधिकार आहे त्या सर्वांच्या सानिध्यात बार्शीतच पुरस्कार देण्यात यावा, अशी विनंती केल्यानंतर विद्यापीठाने बार्शीत या सोहळ्याचे आयोजन केले.
    कार्यक्रमाच्या सुरुवातीस छत्रपती शिवाजी महाराज, कर्मवीर डॉ. मामासाहेब जगदाळे यांच्या अर्धपुतळ्याचे पूजन व दिपप्रज्वलन करण्यात आले. यावेळी ज्येष्ठ पत्रकार अनंत दिक्षीत, संस्थेचे अध्यक्ष डॉ.बी.वाय. यादवमुविद्यापीठाचे कुलसचिव प्रकाश आतकरे निंबाळे यांनी विचार व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.राजेंद्र दास, प्रा.मोरे यांनी केले. वंदेमातरम म्हणून कार्यक्रमाची सांगता झाली.
 
Top