पांगरी (गणेश गोडसे) :- सोलापुर जिल्हयाच्या इतर तालुक्यात डाळिंब व बोरांच्या बागा काढुन टाकल्या जात असताना कुसळंब परिसरात मात्र दिवसेंदिवस बोरांच्या लागवड क्षेत्रात मोठी वाढ होत असुन कुसळंबच्या उजाड माळरानावर सध्या २०० ते ३०० एकर क्षेत्रावर बोरांच्या बागा आहेत. या भागात उमरान व कडाका या बोरांच्या बागांचे मोठया प्रमाणात उत्पादन घेतले जाते.
    सन १९८९ साली कुसळंब येथील अरूण शिंदे या शेतक-याने माळरानावर पहिली बोरांच्या बागेची प्रात्याक्षिक स्वरूपात लागवड केली. त्यात ते यशस्वी झाल्यामुळे व पावसाच्या पाण्यावर बोरांची बाग फुलत असल्याचे लक्षात आल्यावर त्यांचा आदर्श घेत इतर शेतक-यांनी हळुहळु आपल्या मुरमाड व कमी प्रतिच्या जमीनीत बोरांची लागवड केली व प्रतिवर्षी क्षेत्रात वाढच होत गेली आहे. आज कुसळंबची ओळख महाराष्ट्रासह भारताच्या इतर राज्यात बोरांचे कुसळंब अशी होत आहे. बोरांचा हंगाम संपताच एप्रिल महिन्‍यात बागांची छाटणी केली जाते. मात्र यावर्षी प्रतिवर्षीच्या तुलनेत लवकरच छाटनी होण्याची चिन्हे आहेत. कारण चालु वर्षी पर्जन्‍यमान म्हणावे असे झालेले नाही. फुटवा फुटल्यानंतर व फुले बाहेर पडल्यानंतर दर दहा दिवसांना भुरी या रोगाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी विविध किटकणाशके फवारावी लागतात. बोरे तयार झाल्यानंतर मुंबई, दिल्ली, पुणे, इंदौर, नांदेड, लातुर, निजामाबाद, अंकलेश्‍वर, गुजरात, कटकभुवणेश्‍वर, ओरिसा आदी ठिकाणचे व्यापारी कुसळंब येथे येऊन शेतामधुन बोरे खरेदी करून त्यांच्या त्यांच्या बाजारपेठेत पाठवुन देतात.
    कुसळंबच्या बोरांच्या इतिहासात प्रथमच यावर्षी घसघसीत दर मिळाला असुन 35 रूपये किलो पर्यंत उच्चांकी दर येथिल बोर उत्पादकांना मिळाला आहे. त्यामुळे बोर उत्पादक शेतक-यांच्या तोंडावर हसु आले असुन शेतक-यांमधुन समाधान व्यक्त होत आहे. कारण यापुर्वी २ रूपयांपासुन ५ रूपयांपर्यंतच दर शेतक-यांच्या पदरात पडला असल्याचे शेतक-यांकडुन समजते. गतवर्षी १० ते १३ रूपयांपर्यंत दर शेतक-यांना मिळालेला होता. मात्र यावर्षी उत्पादकांची चांगलीच चलती असुन १० ते ३५ रूपयांच्या दरम्यान उच्चांकी दर मिळाला आहे. त्यामुळे ५० हजाराचे एकरी उत्पादनाचे उदिष्‍ट असलेल्या शेतक-यांना यावर्षी एकरी दोन लाख रूपयांचे उत्पन्न अपेक्षित धरले आहे.

थंडीमुळे विक्रीवर परिणाम
    वातावरणातील थंडीच्या परिस्थतीमुळे बोरांना बाजारपेठेत मोठा उठाव नसल्याचे दिसत आहे. बोर हे तसे सर्वसामान्यांचे व स्वस्तात उपलब्ध होणारे फळ असल्यामुळे मध्यमवर्गियांमधुनच बोरांना चांगली मागणी असते. मात्र गतवर्षी पाण्याचा अभाव असल्यामुळे बोरांची प्रतही चांगल्याप्रकारे तयार होऊ न शकल्यामुळे उच्चभ्रुवर्गातुन त्याला म्हणावा असा प्रतिसाद मिळत नसुन सामान्य ग्राहक मात्र या फळाकडे पाठ न फिरवता त्याचा आस्वाद घेताना दिसत असल्याचे शेतक-यांमधुन बोलले जाते.
    निसर्गाच्या लहरीपणामुळे व दर अत्यल्प मिळत असल्यामुळे इतर भागातील व तालुक्यातील अनेक शेतक-यांनी आपल्या बागांना कु-हाड लावली. मात्र कुसळंब येथिल शेतक-यांना शेतीच्या कायमच्या पाण्याअभावी इतर कुठल्याच पिकाचा पर्याय नसल्यामुळे फक्त बोर या पिकावरच अवलंबुन रहावे लागत असल्यामुळे येथिल शेतक-यांनी आपल्या बागा जोपासल्या आहेत. इतर पिकांना शासन अनुदान देते, मात्र बोर उत्पादकांकडे मात्र म्हणावे असे लक्ष दिले जात नाही. त्यामुळे बोर ऊत्पादक उपेक्षितच राहीला आहे. दराबाबत चालु वर्षीचा अपवाद वगळता बोर उत्पादकाच्या नशिबी कायमच निच्चांकी दरच मिळाला आहे. एक एकर बाग जोपासण्यासाठी 20 हजारापर्यंत खर्च येतो. पाणी उपलब्ध असलेल्या शेतक-यांना यावर्षी एकरी दिड लाखांपर्यंत उत्पन्न अपेक्षित आहे. बोरांच्या मोठया प्रमाणात होणा-या उत्पादनाचा विचार करता शासनाने बोर प्रक्रिया उद्योग उभारणे गरजेचे असुन त्यावर तात्काळ कार्यवाही व्हावी, अशी येथिल बोर उत्पादकांची मागणी आहे. २००९, २०१२ साली बोरांचे दर घसरलेले असल्यामुळे शेतक-यांनी परराज्यातील एका कंपनीला बोरे विकले होते. मात्र त्या कंपनीने कवडीमोल दरात बोरे खरेदी करूनही येथिल शेतक-यांना लाखो रूपायांना टोपी घातली असल्याचे येथिल उत्पादकांनी सांगितले. कुसळंबसह आगळगांव, पांगरी, भोयरे, कळंबवाडी, धोत्रे, खामगांव, घारी, वाणेवाडी आदी ठिकाणी मोठया प्रमाणात बोरांचे ऊत्पादन घेतले जाते.
    कुसळंबचे माजी सरपंच विश्‍वास काशिद, अनंत चौधरी, कुमार धावडे, वैभव पोटरे, अरूण वाकुरे आदी शेतकरी बोर लागवड व उत्पादनात आघाडीवर असुन येथे प्रतिवर्षी लागवडीच्या क्षेत्रात वाढच होत आहे.
 
Top