उस्‍मानाबाद :- 25 वा राज्‍य सुरक्षा अभियानाच्‍या अनुषंगाने उस्‍मानाबाद जिल्‍हा मराठी पत्रकार संघ व उपप्रादेशिक परिवहन कार्यालय उस्‍मानाबाद यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने दि. 4 जानेवारी 2014 रोजी उस्‍मानाबाद जिल्‍ह्यातील पत्रकार व शासकीय अधिका-यांसाठी ड्रायव्‍हींग लायसन आणि रोड सेफ्टी या विषयावर मार्गदर्शन शिबीराचे आयोजन करण्‍यात आले आहे.
    उस्‍मानाबाद जिल्‍हा मराठी पत्रकार संघ पत्रकारांसह समाजातील विविध घटकासाठी वेगवेगळे उपक्रम राबवित असतो. सन 2014 हे वर्ष राज्‍य रस्‍ता सुरक्षा अभियानाचे 25 वे वर्ष आहे. याचे औचित्‍य साधून उस्‍मानाबाद जिल्‍हा मराठी पत्रकार संघ व उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्‍या मदतीने पत्रकार व विविध कार्यालयात काम करणा-या शासकीय अधिका-यांसाठी दुचाकी, चार चाकी गाडीचे ड्रायव्‍हींग लायसन काढण्‍याचे शिबीर शनिवार दि. 4 जानेवारी 2014 रोजी सकाळी अकरा वाजता आरटीओ कार्यालय एमआयडीसी येथे घेत आहेत. या शिबीरात सहभागी होण्‍यासाठी पत्रकार व अधिका-यांनी आपली नावे पत्रकार संघाकडे नोंदवून लायसन्‍ससाठी लागणारी सर्व आवश्‍यक कागदपत्रे दि. 2 जानेवारीपर्यंत पत्रकार संघाचे अध्‍यक्ष संतोष जाधव व सचिव राजाभाऊ वैद्य यांच्‍याकडे जमा करावीत. गाडीच्‍या लायसन्‍ससाठी दोन फोटो, वयाचा दाखलासाठी पॅनकार्ड, जन्‍म दाखला, टीसी आणि अॅड्रेस प्रुफसाठी आधार कार्ड किंवा मतदान कार्डाची छायांकित प्रत आवश्‍यक आहे.
    ड्रायव्‍हींग लायसन्‍स बरोबरच रस्‍ता सुरक्षा यावर जनजागृती होण्‍यासाठी 'रस्‍ता सुरक्षा आणि रोड सिंग्‍नल' या विषयावर तज्ञाचे मार्गदर्शनपर व्‍याख्‍यान त्‍याचदिवशी आयोजित केलेले आहे. तरी या शिबिराचा लाभ घ्‍यावा, असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय मैत्रेवार, उस्‍मानाबाद जिल्‍हा मराठी पत्रकार संघाचे अध्‍यक्ष संतोष जाधव, सचिव राजाभाऊ वैद्य, कोषाध्‍यक्ष संतोष हंबीरे व पदाधिका-यांनी केले आहे.
 
Top