बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) :- सर्वात प्राचीन खेळ म्हणून प्रसिध्द असलेल्या मल्लविद्या अर्थात कुस्ती या खेळाचा इतिहास लिहितांना बार्शीचे नांव सुवर्ण अक्षरांचे असेल. बार्शीसह तालुक्यातील गावागावात सुरु असलेल्या कुस्तीच्या आखाड्यांनी लाल मातीचा रंग अधिक गडद होत आहे, कालमानानुसार बदलत चाललेल्या नवनवीन खेळानंतरही कुस्तीचे आकर्षण कमी न होण्‍याचे कारण हे आजपर्यंत अनेकांनी आपले आयुष्य खर्ची घातले हे होय.
    रामायण, महाभारतातही या मल्लविद्येचे दाखले देण्यात आले असून त्यापूर्वीही पुराणात तसेच इतिहासात अनेक ठिकाणी या खेळाचे उल्लेख दिसून येतात. ना. दिलीप सोपल यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून मागील अकरा वर्षांपासून बार्शी शहरात दुर्लक्षीत होत चाललेल्या मल्लविद्या खेळाच्या स्पर्धा मोठ्या प्रङ्काणात घेऊन तालुक्यासह राज्यभरातील मल्लांना नवसंजीवनी आणि चांगले प्रोत्साहन देण्याचा यशस्वी प्रयोग करण्यात आला.
    बार्शीतील याराना ग्रुप, स्व.सुधीर रसाळ व्यायाम शाळेच्या माध्‍यमातून राजेंद्र रसाळ यांच्या पुढाकाराने या स्पर्धा राबविण्यात आल्या. पैलवानांना प्रोत्साहनासाठी आकर्षक पारितोषिके, खुराकासह मल्लांची सर्वतोपरी बडदास्त, चांगले नियोजन, शिस्त, वैयक्तिक लक्ष यामुळे बार्शीचे नांव सर्वदूर झाले आहे. मागील अकरा वर्षांच्या सातत्यानंतरही आयोजक मंडळाच्या कार्यकर्त्यांचा उत्साह नव्या जोमाने वाढतच असल्याचे दिसून येत आहे. यावर्षीच्या कुस्ती स्पर्धा भगवंत मैदान येथे दि. १० ते १२ जानेवारी दरम्यान आयोजित करण्यात आल्या आहेत. यामध्ये खुल्या गटासह ८६, ७६, ६६, ५६ व ४६ या विविध वजनी गटांचा समावेश आहे. मानाची चांदीची गदा, चांदीचे कडं यासह रोख रक्कम व मानाचा फेटा देऊन भगवंत केसरीच्या विजेत्यास गौरविण्यात येते. यापूर्वीच्या स्पर्धेतून सुमारे अडीच किलो वजनाच्या चांदीच्या गदेसह स्पर्धा आयोजकांनी यापूर्वी ट्रॅक्टर, बुलेट गाडी देत भगवंत केसरीच्या मानकर्‍यास आयोजकांनी गौरविले आहे. यावर्षीच्या बाराव्या भगवंत केसरीच्या विजेत्या मल्लास रोख रकमेसह पाचशे सीसी इंजिन क्षमतेची बुलेट देऊन गौरविण्यात येणार आहे. उविजेत्यास रोख पन्नास हजार रूपये तर तृतीय क्रमाकांच्या मल्लास पंचवीस हजार रूपये रोख देऊन गौरविण्यात येणार आहे.
     
    भगवंत केसरी कुस्ती स्पर्धेसाठी रूस्तम ए हिंद स्व.हरिश्‍चंद्र बिराजदार, हिंद केसरी गणपतराव आंधळकर, दिनानाथ सिंह, सचिन खुर्द, किसन मेकाले, रवींद्र पाटील, समाधान घोडके, विजय चौधरी यांच्या उपस्थितीने आजपर्यंत बार्शीचा गौरव वाढला आहे. या स्पर्धेचे समालोचक शंकर पुजारी, रामभाऊ देवकते तसेच कुरूंदवाड येथील प्रसिध्द हलगी वादक राजू हावळे यांनी कुस्तीच्या सामन्यात रंग आणला आहे. या स्पर्धेसाठी पंच म्हणून रावसाहेब मगर, अरूण कंडरे, आबा मांजरे, गणेश जाधव, आबा कडवे, मुन्ना डमरे, तात्या पडवळ, बप्पा जाधव, नारायण बारंगुळे, बाळू नांदेडकर, शिरीष राऊत, भारत पवार, रमेश पाटील, माणिक मारडकर, दत्ता शिंदे हे काम पाहतात. औद्योगिक वसाहतीचे चेअरमन सुधीर सोपल, माजी नगराध्यक्ष योगेश सोपल यांच्या मार्गदर्शनाखाली माजी उपनगराध्यक्ष राजाभाऊ रसाळ, याराना ग्रुपचे गणेश नान्नजकर, सुनील गांधी, देवेंद्र कांबळे, पंकज शिंदे, भगवान गोरे, बाबा माळगे, सुधीर जाधवर, शिवलींग कापसे, बापू वायचळ हे परिश्रम घेत आहेत.
 
Top