सोलापूर :- शहीद गुलाबसिंह लोधी यांच्यावरील टपाल तिकीटाचे प्रकाशन केंद्रीय गृहमंत्री सुशिलकुमार शिंदे यांच्या हस्ते इंदिरा भवन येथे झाले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आ. प्रकाश यलगुलवार हे होते.
      या प्रसंगी आ. प्रणिती शिंदे, लोधी समाजाचे राज्याचे अध्यक्ष माणिकसिंग मैनावाले, बाळासाहेब शेळके, धर्मा भोसले आदी उपस्थित होते.
    यावेळी बोलतांना गृहमंत्री शिंदे म्हणाले की, शहीद लोधी यांच्यावरील टपाल तिकीटाचे प्रकाशन सोलापूरात होत आहे ही आमच्यासाठी गौरवाची बाब आहे. स्वातंत्र्य चळवळीत भाग घेणे हे वीरांचे काम आहे. शहीद लोधी यांनी देशाच्या स्वातंत्र्य आंदोलनात भाग घेऊन तिरंगा फडकविला व स्वत:चे बलिदान दिले याबद्दल त्यांना अभिवादन केले. लोधी समाज हा जास्त सुशिक्षित नाही परंतु अन्यायाविरुध्द लढण्यास सदैव तयार असतो. या समाजास केंद्र स्तरावर ओबीसी आरक्षण मिळावे अशी समाजाची मागणी आहे. याबाबत लक्ष घालण्याचे आश्वासन ना. शिंदे यांनी दिले.
    याप्रसंगी आ. प्रणिती शिंदे व माणिसिंग मैनावाले यांनी या समाजास केंद्र स्तरावर ओबीसी आरक्षण मिळाले पाहिजे अशी मागणी केली.
    यावेळी प्रकाश यलगुलवार यांचेही समयोचित भाषण झाले. शहीद गुलाबसिंह लोधी यांच जन्म 1903 मध्ये उत्तर प्रदेशमधील उन्नाव जिल्ह्यातील फत्तेहपूर चौरासी येथे झाला. महात्मा गांधीजी यांच्या अमीना पार्क येथील झेंडा सत्याग्रहात भाग घेऊन 1935 मध्ये गोळीबारात ते शहीद झाले.
 
Top