नळदुर्ग -: मैलारपूर (नळदुर्ग) येथील श्री खंडोबाच्‍या दर्शनासाठी रविवार दि. २९ डिसेंबर रोजी भाविकांची मोठी गर्दी झाली होती. दिवसभरात हजारो भाविकांनी श्री खंडेरायाचे दर्शन घेतले.
     रविवार रोजी सकाळी ९ वाजता श्री खंडोबास अभिषेक झाल्यानंतर महापुजा करण्यात आली. त्‍यानंतर आरती करण्यात येवून प्रदक्षणा घालण्यात आली. पुजेनंतर भाविकांना दर्शनासाठी मुख्य गाभा-यात सोडण्यात आले.
   अनेक भाविकांनी दंडवत घालत श्री खंडोबाचे दर्शन घेतले.तसेच दर्शनासाठी गावोगावचे अनेक वारू आले होते.हलकीच्या विशिष्ठ ठेक्यावर बेधुंद नाचणा-या वारूमुळे आणि येळकोट,येळकोट जय मल्हारच्या जयघोषामुळे वातावरण भारावून गेले होते.
        सकाळी दहा वाजल्यापासून भाविकांची दर्शनासाठी रांग लागली होती. दुपारी चारपर्यंत रांग कायम होती. जवळपास वीस हजार भाविकांनी दिवसभरात दर्शन घेतले. सर्व भाविकांना मंदिर समितीच्या वतीने मोफत अन्नदान करण्यात आले.
      सध्या मंदिराच्या शिखराचे रंगकाम सुरू असून,भाविकांसाठी बांधण्यात येणा-या खोल्यांचे काम अंतिम टप्प्यात आहे.पालकमंत्री मधुकरराव चव्हाण यांच्या प्रयत्नामुळे बांधकाम विभागाच्या वतीने मंदिराच्या छबिना मार्गावर सिमेंट रास्ता मंजूर झाला असून,त्याचे काम लवकरच सुरू होणार आहे.
    दरम्यान,नळदुर्गचे नूतन पोलीस निरीक्षक संतोष गायकवाड यांनी मंदिरास भेट देवून बंदोबस्ताची पाहणी केली. यावेळी त्यांचा मंदिर समितीच्या वतीने पुजारी आणि माजी सभापती बालाजी मोकाशे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी मंदिर समितीचे सचिव सुनील ढेपे, उपाध्यक्ष दिलीप मोकाशे, सदस्य नवनाथ ढोबळे आदी उपस्थित होते.
 
Top