उस्मानाबाद :- शेळी समूह सेवादाता आणि शेळी समूह शेळीपालक यांचे प्रशिक्षण व लाभार्थ्यांना धनादेश वाटपाचा कार्यक्रम रविवार, दि. २९ रोजी तुळजापूर तालुक्यातील तीर्थ (बुद्रुक) येथील मेंढी व शेळी विकास महामंडळ प्रक्षेत्रावर सकाळी ११ वाजता होणार आहे. राज्याचे पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्यव्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री मधुकरराव चव्हाण यांच्या हस्ते हा कार्यक्रम होणार आहे.
       या कार्यक्रमावेळी पशुसंवर्धन विभागामार्फत सन २०१३-१४ या वर्षातील नावीन्यपूर्ण योजनेंतर्गंत दुधाळ संकरित गाई व म्हैस गट पुरवठा, अंशत: ठाणबंद शेळीपालन गट पुरवठा, एक हजार मांसल कुक्कुट पक्षी संगोपनाद्वारे कुक्कुट पालन व्यवसाय सुरु करणे, गट वाटप करणे, राष्ट्रीय कृषी विकास योजना  व केंद्र पुरस्कृत यजनेमधून मुरघास युनिट तयार करणे या विविध योजनेतील निवड झालेल्या लाभार्थींना अनदानाचे धनादेश वाटप पालकमंत्री चव्हाण यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
       याशिवाय याठिकाणी शेळी समूह सेवादाता आणि शेळी समूह शेळीपालक यांचा प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. प्राणीजन्य प्रथिनांच्या उपलब्धतेमध्ये वाढ करण्यासाठी राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत पारंपरिक शेळी पालनपद्धतीमध्ये शेळ्या व बोकडांची मांस उपलब्धता वाढविणे या राष्ट्रीय मोहिमेद्वारे २०० शेळीपालकांकडील  एक हजार शेळ्यांचा एक समूह याप्रमाणे जिल्ह्यात २५ शेळी समूह सेवादात्यांची नेमणूक करण्यात आली आहे. प्रत्येक शेळी समूहासाठी २लाख २१ हजार पाचशे याप्रमाणे तरतूद देण्यात आली आहे. तर शेळी समूह सेवादात्यांना प्रति महिना दीड हजार  रुपयांप्रमाणे १२ महिन्यांकरिता १८ हजार रुपये देण्यात येणार आहेत. या विविध योजनेंतर्गत निवड केलेल्या शेळी समूह सेवादात्यास पाच दिवसांचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. तीर्थ येथे आयोजित प्रशिक्षण कार्यक्रमत २५ शेळी समूह सेवादात्यांचे आणि तुळजापूर व उमरगा तालुक्यातील ४३१ शेळीपालकांचे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे.
 
Top