उस्‍मानाबाद -: कुंथलगिरी     (ता. भूम) येथील श्री देशभूषण कुलभूषण ब्रम्‍हचर्याश्रमाच्‍या शताब्‍दी    महोत्‍सव महामस्‍तकाभिषेकासाठी कुंथलगिरी सिध्‍दक्षेत्र सज्‍ज झाले आहे. प.पू. 108 चंद्रप्रभूसागर व प.पू. १०८ सुधर्मसागर महाराजांचे कुंथलगिरी येथील सिद्धक्षेत्रावर आगमन झाले असून सदरील महोत्सव यशस्वी करण्यासाठी महाराजांचे मौलीक मार्गदर्शन लाभत आहे.
    म तालुक्यातील श्री दिंगबर जैन सिद्धक्षेत्र कुंथलगिरी येथील श्री देशभूषण कुलभूषण ब्रम्हचर्याश्रमचा शताब्दी महोत्सव व महामस्तकाभिषेक ५ ते ८ डिसेंबर २०१३ या कालावधीत साजरा केला जाणार आहे. सन १९९३ साली कुंथलगिरी या सिद्धक्षेत्रावर ब्र.पार्श्‍वसागरजी महाराज यांनी श्री. देशभूषण कुलभूषण ब्रम्हचर्याश्रमाची स्थापना केली आहे. ही संस्था शताब्दी महोत्सव साजरा करीत आहे. दि. 5 ते 8 डिसेंबर या कालावधीत शताब्‍दी महोत्‍सव व महामस्‍तकाभिषेक विविध कार्यक्रमाने साजरा होणार आहे. महोत्‍सवादरम्‍यान स्‍मरणिका प्रकाशन, माजी विद्यार्थी मेळावा होणार आहे. कुंथलगिरी हे सिध्‍दक्षेत्र जैन धर्मियांचे अत्‍यंत महत्‍त्‍वाचे व श्रध्‍दाचे स्‍थान आहे. या क्षेत्राची जगभर प्रसिध्‍दी व्‍हावी, यासाठी खास क्षेत्राच्‍यावतीने कुंथलगिरीची वेबसाईट काढण्‍यात आलेली आहे. या कार्यक्रमात सदरील वेबसाईटचे लोकार्पण देखील करण्‍यात येणार आहे. त्‍याचबरोबर दि. 6 डिसेंबर रोजी शताब्‍दी महोत्‍सवानिमित्‍त भव्‍य रोग निदान शिबीर व रक्‍तदान शिबीराचे आयोजन करण्‍यात आले आहे.
    बारा वर्षातून एकदा भगवान बाहुबली व भगवान मुनिसुव्रनाथ मानस्‍तंभाचा महामस्‍त‍काभिषेक होत असतो. या कार्यक्रमादरम्‍यान महामस्‍तकाभिषेकाचे देखील आयोजन करण्‍यात आले आहे. त्‍याचबरोबर दि. 7 व 8 डिसेंबर रोजी मुख्‍य मंदिरावर हेलिकॉप्‍टरने पुष्‍पवृष्‍टी होणार आहे. शंभर वर्षात पहिल्‍यांदाच होणा-या हेलिकॉप्‍टरने पुष्‍पवृष्‍टी ही सर्वांच्‍याच आकर्षाचे केंद्रबिंदू आहे. शताब्‍दी महोत्‍सव व महामस्‍तकाभिषेकासाठी कुंथलगिरी सिध्‍दक्षेत्र सज्‍ज झाले असून भव्‍य संभा मंडपासह स्‍टॉलचे काम पूर्ण झाले आहे. कुं‍थलगिरी येथील श्री देशभूषण कुलभूषण ब्रम्‍हचर्याश्रमाचा शताब्‍दी महोत्‍सव व महामस्‍तकाभिषेकासाठी सर्वांनी उपस्थित राहावे, असे आवाहन श्री दिगंबर जैन सिध्‍दक्षेत्राच्‍या विश्‍वस्‍तांनी केले आहे.
 
Top