उस्मानाबाद :- महिला आर्थिक विकास महामंडळाच्या उस्मानाबाद कार्यालयाच्या वतीने आयोजित तेजस्विनी बाजार महोत्सव-2013 उपक्रमाचा समारोप सोमवारी झाला. पन्नासहून अधिक बचत गटांचा सहभाग असणा-या या महोत्सवात दीड लाखांहून अधिक रुपयांची उलाढाल झाली.
       तीन दिवसीय या जिल्हास्तरीय उपक्रमाचा समारोप नाबार्डचे जिल्हा व्यवस्थापक सी.डी. देशपांडे, जिल्हा अग्रणी बॅंकेचे व्यवस्थापक भीमराव दुपारगुडे आणि जिल्हा माहिती अधिकारी दीपक चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. माविमचे जिल्हा समन्वय अधिकारी संतोष इंगोले, ढोकी लोकसाधन केंद्राच्या चारुशीला पाटील, साधना चव्हाण, सहायक समन्वय अधिकारी श्री. म्हस्के, लेखाधिकारी हुसैनी आदींची यावेळी उपस्थिती होती.
      यावेळी या बाजार महोत्सवात सर्वाधीक विक्री केलेल्या महिला बचत गट प्रतिनिधींचा सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. सहभागी झालेल्या बचत गट प्रतिनिधींनाही यावेळी प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले.
      यावेळी मार्गदर्शन करताना देशपांडे म्हणाले की, बचत गटांची चळवळ मोठ्या प्रमाणात फोफावली आहे. महिला मोठ्या आत्मविश्वासाने या चळवळीच्या माध्यमातून कार्यरत झाल्या आहेत. मात्र, बाजारपेठेची गरज ओळखून, उपजत कलाकौशल्याला वाव देणारे उत्पादन या बचत गटांच्या माध्यमातून होणे अपेक्षित आहे. ठिकठिकाणी होणाऱ्या बचत गट प्रदर्शनात सहभागी होऊन महिलांनी नावीन्याचा शोध घेतला पाहिजे.
      दुपारगुडे यांनीही बचत गटामुळे महिलांमध्ये आलेल्या आत्मविश्वासाचे कौतुक केले. कौटुंबिक पाठिंब्यामुळे आणि महिला बचत गटातील इतर सहकाऱ्यांमुळे महिला अगदी दिल्लीपर्यंत सहभागी होऊ लागल्या आहेत.  हा आत्मविश्वास बचत गट चळवळीला बळ देणारा असल्याचे त्यांनी सांगितले.
      चव्हाण यांनी शासनाच्या योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी बचत गट एक प्रभावी माध्यम म्हणून पुढे येत असल्याचे सांगितले.
            इंगोले यांनी प्रास्ताविकात या उपक्रमाबद्दलची माहिती दिली तसेच गेल्या तीन दिवसात बचत गटाच्या या प्रदर्शनास उस्मानाबादकर नागरिकांनी दिलेल्या प्रतिसादाबद्दल आभार मानले. बचत गट प्रतिनिधी आणि नुकत्याच दिल्ली येथे झालेल्या बचत गट प्रदर्शनात सहभाग नोंदविलेल्या साधना चव्हाण व श्रीमती पाटील यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन म्हस्के यांनी केले. 
 
Top