उस्मानाबाद -: उस्मानाबाद जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी रविवार, दि. १५ डिसेंबर रोजी राज्यस्तरीय नगरपरिषद सेवा संवर्ग रिक्त पदाची भरती परीक्षा सकाळी ११ ते दुपारी १ व दुपारी २ ते ४ यावेळेत होणार आहे. सदर परीक्षा होणार असणा-या परीक्षा केंद्र परीसरात प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत.
     येथील श्री श्री रविशंकर विद्यामंदिर, जाधववाडी रोड, आयुर्वेदिक महाविद्यालय, तुळजापूर रोड, आणि लिटल स्टार प्राथमिक शाळा, पोलीस लाईन, (सर्व उस्मानाबाद) या  केंद्रांवर ही  परीक्षा होत असून परीक्षा केंद्र परिसरात फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ अन्वये सकाळी ८ ते सायंकाळी ५ यावेळेत प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आल्याचे अपर जिल्हादंडाधिकारी संजय गायकवाड  यांनी कळविले आहे.
    या आदेशानुसार परीक्षा केंद्राच्या १०० मीटर परिसरात घोषणा देण्यास, परीक्षार्थी अथवा अन्य व्यक्तीकडून शांततेस बाधा निर्माण होईल असे कृत्य करण्यास मनाई करण्यात आली आहे. याशिवाय या परिसरातील झेरॉक्स सेंटर्स , पानपट्टी, टायपींग सेंटर, एस. टी. डी. बुथ, ध्वनीक्षेपक, कॉम्पूटर सेंटर्स तसेच इंटरनेट कॅफे बंद राहतील. परीक्षा केंद्र परिसरात मोबाईल, सेल्यूलर फोन, फॅक्स, ई-मेल व इतर प्रसार माध्यमे घेऊन प्रवेश करण्यास मनाई करण्यात आली आहे.
       परीक्षा केंद्रांवर कोणत्याही वाहनास प्रतिबंध असेल. केवळ संबंधित परीक्षा केंद्रांवर नेमणूक केलेले अधिकारी/ कर्मचारी, शासकीय कामावरील अधिकारी व कर्मचारी, संबंधित शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक, कर्मचारी आणि उमेदवारांनाच परीक्षा केंद्रांवर प्रवेश असेल. परीक्षा केंद्राच्या १०० मीटर आवारात ५ किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तींना एकत्र येता येणार नाही. हे आदेश संबंधित दिवशी सकाळी ८ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत लागू राहणार आहेत.  
 
Top