उस्मानाबाद :- उस्मानाबाद जिल्हास्तरीय महसूल क्रीडा स्पर्धेचा आज येथील श्री तुळजाभवानी जिल्हा क्रीडा संकुल येथे शानदार प्रारंभ झाला. जिल्हाधिकारी डॉ. के. एम. नागरगोजे यांनी यांना स्पर्धा ध्वज फडकावून आणि दीपप्रज्वलन करुन या स्पर्धेचे उदघाटन केले. उस्मानाबाद, कळंब, उमरगा आणि तुळजापूर उपविभाग आणि जिल्हाधिकारी कार्यालय असे संघ या स्पर्धेत सहभागी झाले आहेत.
    उदघाटन समारंभास जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस.एल. हरिदास, अपर जिल्हाधिकारी जे. टी. पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी संजय गायकवाड यांच्यासह उपजिल्हाधिकारी सर्वश्री बी.एस.चाकूरकर, के. ए.तडवी, शिल्पा करमरकर, संतोष राउत, राम मिराशे, उपविभागीय अधिकारी सर्वश्री प्रशांत सूर्यवंशी, व्ही.एल. कोळी, सचिन बारवकर यांच्यासह जिल्हा क्रीडा अधिकारी संजीव कुलकर्णी, तहसीलदार सर्वश्री सुभाष काकडे, शशीकांत गायकवाड, अहिल्या गाठाळ, मनीषा मेने, डी.एम. शिंदे, व्ही.एस. शिंदे, श्री. राठोड आदींची यावेळी व्यासपीठावर उपस्थिती होती.
    स्पर्धा उदघाटनानंतर सहभागी खेळाडूंनी शानदार संचलन केले. तत्पूर्वी, सर्व खेळाडूंनी खिलाडूवृत्ती जोपासण्याची शपथ घेतली.
    जिल्हाधिकारी डॉ. नागरगोजे यांनी स्पर्धा हा जीवनाचा भाग असल्याचे सांगितले. यशासाठी सातत्य, चिकाटी, निरंतर प्रयत्न गरजेचे असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले. जागतिक पातळीवर आकाराने छोटे असणारे देश आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये पदक जिंकताना दिसतात. मोठ्या लोकसंख्येच्या आपल्या देशातही हे प्रमाण वाढायला हवे. त्यासाठी क्रीडा संस्कृतीचे वातावरण निर्माण करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.
    श्री. हरिदास यांनी महसूल अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी क्रीडा स्पर्धांचे आयोजन हा स्तुत्य उपक्रम असल्याचे सांगितले. या उपक्रमाला त्यांनी शुभेच्छा दिल्या.
    कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा पुरवठा अधिकारी श्री. मिराशे यांनी केले. महसूल कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष जीवन कुलकर्णी आणि तलाठी संघटनेचे अध्यक्ष जी. टी. अकोसकर यांनी यावेळी क्रीडा स्पर्धेला शुभेच्छा देणारे मनोगत व्यक्त केले. यावेळी महसूल, नायब तहसीलदार, तलाठी, कोतवाल, वाहनचालक, शिपाई, कास्ट्राईब आदी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचे स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी वृषाली तेलोरे यांनी केले तर तुळजापूरचे तहसीलदार गायकवाड यांनी आभार मानले.
    ही स्पर्धा दोन दिवस सुरु राहणार असून या स्पर्धेत क्रिकेट, खो-खो, कबड्डी, हालीबाल, आदी सांघीक क्रीडा प्रकारांसह बॅडमिंटन, टेबल टेनिस, बुद्धीबळ, कॅरम व इतर मैदानी खेळ आदी खेळांचा समावेश आहे.  याबरोबरच सांस्कृतिक कार्यक्रमांचे देखील आयोजन करण्यात आले आहे. वैयक्तिक  व सांघिक स्पर्धेच्या प्राथमिक फे-या १३ डिसेंबर रोजी होणार असून अंतिम फेरी १४ डिसेंबर रोजी होणार आहे. दि. १४ रोजी सायंकाळी ५ वाजता स्पर्धेचा समारोप होणार आहे.   
 
Top