ताज्या घडामोडी

सोलापूर -: बार्शी नगरपरिषदेच्यावतीने सकेश्वर उद्यानाजवळ बांधण्यात आलेल्या छ. संभाजी राजे शॉपिंग सेंटरचा लोकार्पण सोहळा राज्याचे पाणी पुरवठा, स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री दिलीप सोपल व  छ. युवराज संभाजीराजे (कोल्हापूर) यांच्या हस्ते संयुक्तरित्या करण्यात आला.
    या लोकार्पण सोहळ्यानंतर पालकमंत्री सोपल यांना बार्शी नगरपालिकेच्यावतीन मानपत्र प्रदान करण्यात आले तसेच नागरी सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खा. पद्मसिंह पाटील तर प्रमुख अतिथी म्हणून आ. दिपकराव साळुंखे पाटील, आ. दिलीप माने, नगराध्यक्ष कादर तांबोळी, उपनगराध्यक्ष राहुल कोंढारे आदि मान्‍यवर उपस्थित होते.
    यावेळी बोलतांना आ. दिलीप माने म्हणाले की, सोपल यांनी विश्वासार्हतेचे राजकारण केले. तर दिपक साळुंखे पाटील म्हणाले की, सोपल हे पक्षविरहित नेते असुन त्यांच्याकडील संयम व सहनशिलता हा गुण आत्मसात करण्यासारखा आहे.
    याप्रसंगी खा. पद्मसिंह पाटील व छ. युवराज संभाजीराजे यांचेही दिलीप सोपल यांच्याप्रती गौरवपूर्ण भाषणे झाली.
    सत्काराला उत्तर देतांना दिलीप सोपल म्हणाले की, बार्शी शहरासाठी राजीव गांधी आवास योजनेद्वारे 300 कोटी रुपयांचा प्रकल्प शहरात राबविण्यासाठी प्रयत्न करणार तसेच वैराग तालुक्याच्या निर्मितीसाठी कार्यरत राहणार. त्याचबरोबरच राज्यातील गड / किल्यांच्या संवर्धन व्हावे यासाठी मंत्री मंडळाकडे पाठपुरावा करणार.
    कार्यक्रमाचे प्रास्ताविक नगरसेवक नागेश अक्कलकोटे  यांनी केले. याप्रसंगी नगरपालिकेचे मुख्याधिकारी दत्तात्रय लांघी, सुधीर सोपल, योगेश सोपल, तानाजी मांगडे, अब्बास शेख, ज्योतिर्लींग कसबे, देविदास शेटे, सौ. खाजाबी पठाण यांच्यासह बार्शी नगरपरिषदेचे नगरसेवक तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 
Top