कळंब (बालाजी जाधव) :- कॉपी संस्‍कृतीमुळे विद्यार्थी हा दिवसेंदिवस परीक्षार्थी होत चाललेला आहे. विद्यार्थ्‍यांनी कॉपीमुक्‍त होऊन यश संपादन केले पाहिजे, तेच यश ख-या अर्थाने टिकते. विद्यार्थ्‍यांनी जीवनामध्‍ये मोठे ध्‍येय ठेवून इच्‍छा शक्‍तीच्‍या जोरावर ध्‍येय पूर्ण करणे आवश्‍यक असल्‍याचे प्रतिपादन डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील बहीःशाल शिक्षण मंडळाचे संचालक प्रा. कैलास पाथ्रीकर यांनी केले.
    बहीःशाल शिक्षण मंडळ डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ व शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालय, कळंब यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने आयोजित केलेल्‍या वाड्मय मंडळाचे उदघाटन व कॉपीमुक्‍त अभियानाच्‍या उदघाटनप्रसंगी प्रा. पाथ्रीकर हे बोलत होते. यावेळी या कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अशोकराव मोहेकर हे होते. तर प्रमुख पाहुणे म्‍हणून प्राचार्य डॉ. हरिदास फेरे, विद्यापीठाचे जनसपंर्क अधिकारी डॉ. संजय शिंदे आदीजण उपस्थित होते.
    अध्‍यक्षीय समारोपात बोलताना डॉ. मोहेकर म्‍हणाले, प्रतिकुल परिस्थितीमधूनच अनुकुलता निर्माण होत असते, त्‍यासाठी विद्यार्थ्‍यांनी मोठी स्‍वप्‍न पाहून त्‍या दृष्‍टीने वाटचाल करणे महत्‍त्‍वाचे आहे. त्‍याचबरोबर विद्यार्थ्‍यांनी दैनंदिन अभ्‍यासाबरोबर साहित्‍य व आवांतर वाचन करणे देखील महत्‍त्‍वाचे आहे.
 
Top