बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) : कर्मवीर डॉ.मामासाहेब जगदाळे यांच्या जीवनावरील लघुपट आम्ही बार्शीकर परिवाराच्या वतीने एक तासाचा लघुपट आणि दहा मिनीटांची डॉक्युमेंटरी तयार करण्यात येत असून त्यासाठी गुरुवार दि. २३ व २४ रोजी चित्रपट कलाकारांच्या मुलाखती घेण्यात येत आहेत. सर्व वयोगटातील कलाकारांसाठी संत तुकाराम सभागृह येथे या मुलाखती होत आहेत.
    बार्शीच्या इतिहासातील अजरामर असलेले स्व.कर्मवीर डॉ.मामासाहेब जगदाळे यांनी आपले जीवन सर्वसामान्यांसाठी व्यथीत केले. ४ फेब्रुवारी १९०३ ते ३० मे १९८१ पर्यंतच्या मामांच्या जीवनप्रवासातील अनेक घटना या धाराशिव आणि सोलापूर जिल्ह्यातील परिवर्तनाची लाट ठरल्या.
    या लघुपटाचे वैशिष्ट्य म्हणजे राहुल जगदाळे, स्वप्न या लघुचित्रपटाच्या माध्यमातून दक्षिण आफ्रिकेत पोहोचलेले सचिन नलावडे, स्वप्नील नेवाळे, निलेश गणगले, सचिन वीर, सुमित गांधी या अवघ्या तीस वयांच्या आतील तरुणांनी या चित्रपटाचे काम पूर्ण करण्याचा ध्यास घेऊन काम सुरु केले आहे. बार्शीतील राज्यस्तरीय किर्तीचा कलाकार उदय मोहिते हे पोस्टर्सचे काम पाहत आहेत. प्रसाद गुंड हे चित्रपटातील काही ठिकाणी वापरण्यात येणार्‍या त्रिमिती चित्रीकरणावर (थ्रीडी) काम करत आहेत. त्यांच्या जीवनकार्यातील दुर्मिळ व्हिडीओ क्लिप, त्यांच्या भाषणाची ध्वनीफित, दुर्मिळ छायाचित्रे, दुर्मिळ कागदपत्रे, त्यांच्यासोबत कार्य करणार्‍या व्यक्तींच्या मुलाखती, संपूर्ण छायाचित्रण बार्शीतच होणार आहे. छायाचित्रणासाठी लागणार्‍या ट्रॉलीसारख्या अत्यंत महागड्या वस्तूदेखिल बार्शीतच बनविण्यात आल्या आहेत. मागील सहा महिन्यांपासून मामांच्या जीवनातील घटनांचा मागोवा घेत पूर्णपणे अभ्यास करुन याचे सत्य घटनेवरील आधारित कथानक तयार करण्यात आले आहे. यावेळी मामांच्या अनेक माहित नसलेल्या घटनांचा उलगडा झाला आहे. स्व.मामांचे पुतणे वायुपुत्र नारायणराव जगदाळे यांचे मार्गदर्शन या तरुणांना लाभले आहे. ॠमाजकारण, राजकारण, शिक्षणक्षेत्रातील दूरदृष्टी लाभलेल्या डॉ.मामांनी बहुजनांसाठी शिवाजी बोर्डिंग, हरिजनांना समान वागणूक मिळावी याकरिता पहिल्या केशकर्तनालयाला प्रोत्साहन दिले. शेतकरी मजूर संघटनेची स्थापना करुन जनावरांच्या बाजारातील शेतकर्‍यांचा कापला जाणारा खिसा व होणारे अन्याय थांबवले, शिवजयंती उत्सव साजरा करण्यास सुरुवात, छत्रपती शिवाजी महाराजांचा पुर्णाकृती पुतळा, विविध प्रकारच्या आजारांवर उपचार करण्याची सुविधा बार्शीत होण्यासाठी अत्याधुनिक हॉस्पिटलची पायाभरणी केली. सर्व ग्रामीण भागात मुला मुलींच्या शिक्षणाची द्वारे खुली केली. सर्व समाजांच्या व्यक्तींना स्वाभिमानाची शिकवण दिली. शरिर संपत्तीसाठी व्यायामाची आवड निर्माण केली. कष्ट करण्याची, विद्यार्थ्यांनी अंगमेहनत केल्याशिवाय चांगले जीवन घडणार नाही याची प्रकर्षाने जाणीव करुन दिली. परिस्थिती नसलेल्या अनेक मुलांचे मोफत शिक्षणाची सुविधा निर्माण केली. शेतीशाळा, स्वावलंबनाचे धडे दिले. शैक्षणिक कार्याला विरोध करुन काहीजणांनी येडशी येथे त्यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न झाला, शेवटी बोर्डिंगच्या बांधकामाची पाहणी करतांना झालेल्या अपघाताचा त्यांच्या प्रकृतीवर आयुष्यभर परिणाम झाला. निर्मितीनंतर कर्मवीर स्मारकामध्ये दहा मिनीटांच्या डॉक्युमेंटरीचे प्रसारण करण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी राहूल जगदाळे ८३९००५९००६, सचिन नलावडे ९४०४६७६५०१ या क्रमांकावर संपर्क साधावा.
 
Top