उस्मानाबाद :- महाराष्ट्र शासनाच्या मोटार वाहन विभाग (आर.टी.ओ.) तर्फे उस्‍मानाबाद जिल्ह्यात ३०० नवीन अॅटोरिक्षा परवाने जारी करण्यात  येणार असून  इच्छुक अर्जदारांनी वेबबेस्ड ऑनलाईन अर्ज  www.mahaonline.gov.in या वेबसाईटव्दारे दि. २७ जानेवारी रोजी सकाळी ११ ते दि. १५ फेब्रुवारीच्या  सायंकाळी ६ वाजेपर्यंत अर्ज करावेत, असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी संजय मैत्रेवार यांनी  केले आहे.
         ऑनलाईन प्रक्रिया म्हणून शंभर रुपये अदा करणे आवश्यक असून सदर शुल्क नेटबॅकींग, डेबीट कार्ड, क्रेडिट कार्ड, संग्राम केंद्र /सी. एस. सी. नागरी केंद्राव्दारे भरावेत. अर्ज स्वीकारण्यासाठी परिवहन विभागाने महाऑनलाईन या संस्थेची नेमणूक केली आहे. इतर कोणतेही अनाधिकृत व्यक्तीच्या, प्रलोभनास बळी पडु नये. तसे केल्यास परिवहन विभाग जबाबदार राहणार नाही,असेही कळविण्यात आले आहे.
        परवानान्यासाठी अर्ज सादर करावयाच्या दिवशी अर्जदाराचे वय 20 वर्षापेक्षा जास्त असणे आवश्यक असून तो भारतीय नागरीक असावा, शैक्षणिक अर्हता किमान 10 वी इयत्ता उत्तीर्ण, ऑटोरिक्षा बॅचधारक असावा. जर पुरेशा संख्येने अर्ज प्राप्त झाले नाही, तर आठवी उत्तीर्ण ही अट राहील.
       अर्ज करण्याच्या दिनांकास अर्जदाराकडे ऑटोरिक्षा (परिवहन) संवर्गाचा बॅच व अनुज्ञप्ती असणे आवश्यक आहे. त्याचे महाराष्ट्र राज्यातील किमान 15 वर्ष सातत्याने वास्तव्य असले पाहिजे. अर्जदाराने किमान मागील 1 वर्षात गुन्हा केला नसल्याचे प्रमाणपत्र सादर करावे लागेल. अर्जदारास सरकारी/ निमसरकारी/ खाजगी कंपनी अथवा संघटीत क्षेत्रातील कोणत्याही संस्थेत/ उद्योगात नसल्याचे तसेच त्यांच्या नावे ऑटोरिक्षा / टॅक्सी परवाना नसल्याचे प्रतिज्ञापत्र सादर करावे लागेल असेही कळविण्यात आले आहे.
 
Top