उस्मानाबाद -: जिल्हा परिषद शिक्षण विभाग व जिल्हा विज्ञान मंडळाच्या संयुक्त विद्यमाने येथील श्रीपतराव भोसले हायस्कूल,उस्मानाबाद येथे  आयोजित 39 व्या जिल्हा विज्ञान प्रदर्शन, शैक्षणिक साहित्य व लोकसंख्या शिक्षण साहित्य प्रदर्शनातील बक्षीस वितरणाची शानदार सांगता  झाली.
       यावेळी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या प्राचार्या डॉ. कमलाताई आवटे, भोसले हायस्कूलचे प्र.मुख्याध्यापक एस.एस.पडवळ, माध्यमिक शिक्षणाधिकारी वैजनाथ खांडके, उपशिक्षणाधिकारी शिवदास नलावडे, रमेश जोशी, मुख्याध्यापक संघाचे संदीपान कुंभार, गटशिक्षणाधिकारी कल्याण सोनवणे, मराठवाडा साहित्य परिषदेचे सचिव बालाजी तांबे आदि उपस्थित होते.
      श्रीमती आवटे म्हणाल्या की, नव्या युगातील विज्ञानाची गोडी विद्यार्थ्यांमध्ये निर्माण व्हावी यासाठी शास्त्रज्ञांच्या कथांचे वाचन करावे. या विज्ञान प्रदर्शनातून नवनवीन प्रयोगांची निर्मिती करावी. या वातावरणाला सामोरे जाण्यासाठी डोळस विचार व चौकस बुध्दीतून विद्यार्थ्यांनी विज्ञानावर प्रेम करायला शिकले तरच नव्या युगाच्या परिवर्तनाची दारे उघडतील , असे सांगून त्या पुढे म्हणाल्या की, प्रत्येक विद्यार्थी स्वत: निर्माता असतो त्याला शिक्षकांनी योग्य वेळी कृतीयुक्त दिशा दिली तरच शास्त्रज्ञ तयार होतील. नवनवीन शोधाचा उपयोग केवळ विधायक कार्यासाठीच केल्यास त्याची स्वप्नपूर्ती होऊ शकते.
    पडवळ म्हणाले की, विज्ञानाचे ज्ञान विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास वाढविण्यासाठी नवनवीन कल्पनांना प्रोत्साहन देऊन जिल्ह्यातील सर्व शाळांनी असे वारंवार प्रयोग करावेत,असे सांगून राज्यस्तरावर जाणाऱ्या विद्यार्थी व शिक्षकांचे त्यांनी अभिनंदन केले.
यावेळी विद्यार्थ्यांच्या वतीने निलेश शिंदे, भूम, शिक्षकांच्या वतीने मनोहर घोडके, हंगरगा यांनी तर परिक्षकांच्या वतीने एस.के. वाघमारे यांनी मनोगत व्यक्त केले. 
       प्रदर्शनीय वस्तू प्राथमिक गटात इको  फ्रेन्डली सोलार ए.सी. (उर्जा) विभागास जयप्रकाश विद्यालय रुईभर, ता. उस्मानाबाद या शाळेस प्रथम , नायट्रोजन आधारित उर्जा निर्मिती (उर्जा) प्रकल्पास एकलव्य प्राथमिक आश्रम शाळा, यमगरवाडी ता. तुळजापूर यांना द्वितीय तर हवा प्रदुषण नियंत्रक (पर्यावरण) प्रकल्पाने जि.प्रा.शा. आढाळा ता. कळंब यांनी तृतीय परितोषिक मिळविले.
      माध्यमिक प्रदर्शनीय गटात  अपारंपारिक उर्जेचा वापर यात गुरुदेव दत्त हायस्कूल, भूम यांनी प्रथम क्रमांक आणि आर.ओ.यंत्रणा (संसाधन) यामध्ये जयप्रकाश विद्यालय, रुईभर ता. उस्मानाबाद गटाने द्वितीय क्रमांक पटकावला असून कालव्यातील वाहत्या पाण्यातून विद्यूत निर्मिती यासाठी जवाहर उच्च माध्यमिक विद्यालय, अणदूर ता. तुळजापूर यांना तृतीय बक्षिस मिळाले.
       शैक्षणिक साहित्य प्राथमिक शिक्षक गटात हसत खेळत शिक्षणासाठी जि.प.कें. प्राथमिक शाळा, सरमकुंडी ता. वाशी यांना प्रथम क्रमांक मिळाला तर  शैक्षणिक साहित्य माध्यमिक शिक्षक गटात त्रिकोणमितीचा उपयोग यासाठी राजीव गांधी विद्यालय,हंगरगा ता. तुळजापूर यांना प्रथम क्रमांकाचे बक्षिस मिळाले. प्रयोगशाळा सहायक परिचर या प्रदर्शनीय वस्तू  यामध्ये अणुंचा संरचना यासाठी बेलेश्वर विद्यालय, पखरुड ता.भूम यांनी प्रथम.
     लोकसंख्या शिक्षण शैक्षणिक साहित्य प्राथमिक शिक्षक गटात चित्रे व खेळातून लोकसंख्या शिक्षण यामध्ये जि.प.प्रा.शाळा. पेठ, तेर ता.उस्मानाबाद यांना प्रथम, माध्यमिक शिक्षक गटात आरोग्य व पर्यावरण यासाठी जि.प.प्रा.शाळा कळंब ता.कळंब या शाळेने प्रथम क्रमांक मिळविला.
       या विज्ञान प्रदर्शनाचे बक्षिस वितरण मान्यवरांच्या हस्ते यावेळी सर्व बक्षिस पात्र विद्यार्थी व शाळांना प्रमाणपत्र, सन्मानचिन्ह  व बुके देऊन वितरण करण्यात आले. विजयी संघ दि.27 ते 31 जानेवारी,2014 दरम्यान आयोजित धामनगाव जि. अमरावती येथे होणाऱ्या राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनात भाग घेणार आहेत.  
      या विज्ञान प्रदर्शनात परिक्षक म्हणून एस.के.वाघमारे, फावडे ए.एस., मिटकरी ए.ए., श्रीमती जाधव, आंबेवाडीकर, श्रीमती तांबारे, नाडे आणि पवार पी.ए. यांनी काम पाहिले.
       कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हनुमंत पडवळ यांनी केले तर आभार विस्तार अधिकारी एस.बी.माने यांनी मानले. यावेळी प्रदर्शन यशस्वीतेसाठी शिक्षण विस्तार अधिकारी, मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी व विज्ञानप्रेमी यांनी परिश्रम घेतले.
 
Top